आ.हेमंत पाटील यांच्या गोदावरी अर्बन बॅंकेतील खाते दलित समाजाने बंद करावेत-ऍड.नितीन सोनकांबळे

नांदेड(प्रतिनिधी)-विधान परिषदेत महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयकावर बोलतांना आ.हेमंत पाटील यांनी बोंढार जि.नांदेड आणि परभणी शहरातील घटनांचा उल्लेख करून अर्बन नक्षलवाद दलित वस्त्यांमध्ये वाढला आहे हे सांगितले. सोबतच सवर्णिय लोकांवर ऍट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल होत असल्याचे वक्तव्य केले. यावर नांदेड येथील ऍड.नितीन सोनकांबळे यांनी आ.हेमंत पाटील यांच्या वक्तव्याविरोधात दलित समाजाने त्यांच्या गोदावरी अर्बन बॅंकेतील आपले सर्व आर्थिक व्यवहार बंद करावे आणि पाटलांना त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयकाची भुमिका मांडतांना आ.हेमंत पाटील यांनी दलितवस्त्यांमध्ये अर्बन नक्षलवाद वाढला असल्याचे सांगितले. तसेच सवर्ण जातीच्या लोकांवर ऍट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल होत असल्याचे वक्तव्य केले. हेमंत पाटील यांनी डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे डॉ.वाकोडे हा व्यक्ती अनुसूचित जमातीचा असल्याचे माहित असतांना आणि ते अधिष्ठाता पदावर कार्यरत असल्याचे माहित असतांना त्यांच्याकडून बळजबरीने शौचालय साफ करायला लावले. त्या संदर्भाने हेमंत पाटील यांच्यावर ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यात हेमंत पाटलांना अटकही झाली नाही आणि त्या गुन्ह्याची आज काय परिस्थिती आहे हेही माहित नाही. तरी पण असे वक्तव्य केले.
हेमंत पाटील यांनी जातीय अन्यायाविरुध्द आवाज उठविणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना, संघटनांना, आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अर्बन दक्षलवादी म्हणून उल्लेख केला. दलित वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अर्बन नक्षली लोकांचा वाढत असलेल्या प्रभावावर पाऊले उचलण्यात यावी आणि कार्यवाही व्हावी असे सांगितले. ज्यावेळेस हेमंत पाटील यांच्याविरुध्द ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. तेंव्हा आंबेडकर चळवळीतील काही दलालांनी तो गुन्हा खोटा आहे अशा संदर्भाने मोर्चा काढला होता. त्या मोर्चात सहभागी समुदाय सुध्दा अर्बन नक्षली आहे काय याचे उत्तर मात्र हेमंत पाटील यांनी दिले नाही.
ऍड. नितीन सोनकांबळे यांच्या प्रसिध्दी पत्रकाप्रमाणे नांदेड हे आंबेडकर चळवळीचे माहेर घर आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात दलितवस्त्या मोठ्या प्रमाणात आहेत. दलितांवर अन्याय-अत्याचार केला जातो. त्यावेळी हेच पुढारी आरोपींना पाठीशी घालतात.परंतू जातीय मानसिकतेने भरकटलेले एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी अत्यंत बेजबादार वक्तव्य केलेले आहे. हे सांगतांना त्यांना हे का नाही आठवले की, त्यांच्या गोदावरी अर्बन बॅंकेमध्ये अनेक दलित लोकांचे बॅंक खाते आहेत. दलित लोक मोठ्या प्रमाणात त्या बॅंकेतून करतात. हेमंत पाटील यांच्या घरी कामाला दलित भगीनीच होत्या याचा विसर त्यांना पडलेला दिसतो. ऍड. नितीन सोनकांबळे यांनी दलित समाजाला आवाहन केले आहे की, हेमंत पाटील यांच्या बॅंकेमधील आपले खाते बंद करावे आणि हेमंत पाटलांना त्यांची जागा दाखवून द्यावी. अर्बन नक्षलवादाविषयी हेमंत पाटील जे काही बोलले आहेत. त्याबद्दल त्यांनी आंबेडकरी समाजाची माफी मागावी असे आवाहन ऍड. नितीन सोनकांबळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!