ब्रिक्स परिषद आणि गोदी मीडियाचे वास्तव

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा विदेशी दौऱ्यावर असतात, तेव्हा गोदी मीडिया “भारताचा डंका वाजतो आहे” असे सांगते. मात्र ब्रिक्स परिषदेमध्ये ब्राझीलमध्ये घडलेली एक महत्त्वाची घटना,जिथे पंतप्रधान मोदी पहिल्या रांगेत होते, तिथे एकप्रकारे त्यांच्या सोबत “खेळ” झाला. ही बाब मात्र मोदी भक्त मीडियाने पूर्णपणे लपवली. आम्ही ती वाचकांसाठी उघड करत आहोत.
वाचकांनाही दाखवले जात आहे की, पहलगाम हल्ल्याची निंदा (निषेध) झाली. जगातील बहुतेक देशांनी त्याचा निषेध व्यक्त केला. पण महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, या घटनेनंतर पाकिस्तानच्या विरोधात उभा कोण राहिला? पाकिस्तानविरुद्ध कोण बोलले? ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला, तेव्हा कोणत्या देशाने स्पष्ट शब्दांत पाकिस्तानची निंदा केली? ब्रिक्स परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव घेतले नाही. पण गोदी मीडिया सांगते की, त्यांनी कडक शब्दांत पाकिस्तानला इशारा दिला आणि चीनला आरसा दाखवला. कोणता आरसा? कोणते कडक शब्द? आम्हाला तरी असे काही दिसले नाही.

सद्याच्या ब्रिक्स परिषदेमध्ये इराणचे नव्याने आगमन झाले आणि त्यांनी इस्रायलविरुद्धच्या हल्ल्याची निंदा करणारा प्रस्ताव मंजूर करून घेतला. हे सगळं मोदीजींच्या समोर घडलं. याआधी देखील इजरायलविरोधात आलेल्या निंदा प्रस्तावात भारताने सहभाग घेतला नव्हता, आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले होते की त्या प्रस्तावाशी भारताचे काहीही घेणे-देणे नाही.भारत हे ब्रिक्सचे संस्थापक सदस्य असूनही, इराणने सहभागी होताच अशा प्रकारचा प्रस्ताव मंजूर करून घेतला, ही गोष्ट विचारात घेण्याजोगी आहे. विशेष म्हणजे या परिषदेत इराण, रशिया, चीनचे सर्वोच्च नेतृत्व नव्हते, पण भारताच्या वतीने स्वतः पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. आणि तेथे जाऊन आपल्या भूमिकेचे पुरेसे प्रतिनिधित्व करायला ते अपयशी ठरले, असेच म्हणावे लागेल.
गोदी मीडिया मात्र अशा बातम्या देते की, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान आणि चीनला इशारे दिले. पण सत्य हे आहे की, त्यांच्या तोंडून “पाकिस्तान” हा शब्दही निघाला नाही. इराणच्या अब्बास यांनी इस्रायलचा उल्लेख करत जगाला थेट इशारा दिला की, हा हल्ला फक्त इराणवर नव्हे, तर संपूर्ण जगासाठी धोका आहे. अशी ठाम भूमिका भारताने का घेतली नाही? पत्रकार अशोक वानखेडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे की, केंद्र सरकार म्हणते की, पाकिस्तानने लपून हल्ला केला. पण अजूनही पुलवामा हल्ल्याचा तपशील येतो का, हे कळत नाही, तर पहलगामचा येईल का? मग पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानचे नाव घेण्यास घाबरण्याचे कारण काय?
चीन तर पाकिस्तानसोबत उघडपणे उभा आहे. टर्कीने पाकिस्तानला ड्रोन दिले, अझरबैजानने पाठिंबा दिला. आणि आपले पंतप्रधान अजूनही “आरसा दाखवतो” इतक्याच इशाऱ्यांवर सीमित राहतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला “आपला प्रिय मित्र” म्हटले, संयुक्त राष्ट्रातही पाकिस्तानसाठी समर्थन दिले. अशा वेळी भारताच्या पंतप्रधानांनी ठाम भूमिका का घेतली नाही? ब्रिक्स परिषदेतील ‘टेरर विरोधी प्रस्ताव’वर भारताने स्वाक्षरी केली, हे स्वागतार्ह आहे, पण त्याच वेळी पाकिस्तानच्या नावाचा उल्लेख न करणे, ही कमकुवत भूमिका का?
इराणने आपला प्रस्ताव मंजूर करून घेतला, तेव्हा तो ‘रणनीती’ ठरली. पण भारताने प्रस्ताव मांडला असता, तर ती ‘अडचण’ ठरली असती का? 2018 साली ब्रिक्सबद्दल पंतप्रधान मोदींनी वेगळी करन्सी असावी, असे सुचवले होते. पण परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नंतर स्पष्ट केले की, अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती. मग कोण खरे बोलते?
या परिषदेमध्ये भारताने जर ठामपणे पाकिस्तानचे नाव घेतले असते आणि म्हटले असते की, पहलगामवरील हल्ला हा संपूर्ण जगावर हल्ला आहे, तर जगही त्याचे गांभीर्याने घेतले असते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही.गोदी मीडिया मात्र दाखवते की, पंतप्रधान मोदींनी डोळ्यात डोळे घालून ट्रम्पशी संवाद साधला. पण प्रत्यक्षात घडले काय? हे वाचकांनी ठरवावे लागेल.
लोकशाहीत जनतेचा विश्वास हेच सरकारचे बळ असते. जर मीडियाचे काम फक्त प्रचार करणे आणि खरी गोष्ट दडपणे हे असेल, तर हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे.आम्ही एकच गोष्ट सांगतो .ज्या दिवशी पंतप्रधान मोदी पाकिस्तान आणि चीनचे नाव स्पष्टपणे घेऊन जगाला सुस्पष्ट संदेश देतील, त्या दिवशी आम्ही २४ तास त्यांच्यावर कौतुकाने बातम्या दाखवू.पण तो दिवस कधी येणार? तो येईल का?
