नांदेड(प्रतिनिधी)-कोणत्याही गुन्ह्याची फिर्याद देतांना ती पध्दतशिरपणे असावी आणि त्या गुन्ह्याचा तपास अत्यंत सक्षम पध्दतीने झाला तरच गुन्ह्यातील आरोपी शिक्षेपर्यंत पोहचतो. नांदेड जिल्ह्यातील कोपरा ता.हदगाव येथील एका खून प्रकरणातल्या 65 वर्षीय व्यक्तीला दोषमुक्त करतांना न्यायलयाने त्या व्यक्तीविरुध्द त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची शक्यता येत नाही अशी नोंद करून मुक्तता केली आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार 22 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता गंगाधर विश्र्वनाथ घुले हे आपल्या शेतात असतांना त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ जयपाल विश्र्वनाथ घुले, भावजई मुबीना जयपाल घुले हे दोघे हजर होते. तेथे गोविंद राघोजी डोनेराव (66) त्यांच्यासोबत राजरतन साहेबराव जाधव, अजय मारोती गायकवाड आणि शिवाजी गणपत गायकवाड तेथे पोहचले. त्यांनी दारु मागितली. पण दारु नाही असे म्हटल्यानंतर त्यांनी गंगाधर विश्र्वनाथ घुले (50) याला मारहाण केली. त्यात कुऱ्हाडीने गंगाधर घुलेच्या डोक्यावर मार देण्यात आला. त्याला वाचविण्यासाठी आलेल्या जयपाल घुलेला लाकडाने मारले. त्याचेही डोके फुटले. त्यानंतर त्यांना दवाखान्यात देण्यात आले. तामसा-हदगाव-नांदेड-छत्रपती संभाजीनगर असा त्यांचा उपचारासाठी प्रवास झाला. त्यानंतर 28 एप्रिल रोजी गंगाधर विश्र्वनाथ घुलेचा मृत्यू झाला.
या घटनेत पहिल्यांदा हे मंडळी तामसा पोलीस ठाण्यात गेली होती. तेथे पोलीसांनी दवाखान्यात जाण्यासाठीचे जे पत्र दिले. त्यानुसार गंगाधर विश्र्वनाथ घुले आणि त्यांचा भाऊ जयपाल विश्र्वनाथ घुले यांच्यात मारहाण झाली असे लिहिले होते. पुढे 28 एप्रिल 2022 रोजी गंगाधर घुलेच्या मृत्यूप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर 29 एप्रिल रोजी तामसा पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 324, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 44/2022 दाखल झाला. त्यामध्ये दारु पिण्याच्या कारणावरुन मारहाण झाली आणि खून झाल्याचे कारण लिहिले होते.
फिर्यादी जयपाल घुले आणि मयत गंगाधर घुले यांच्यामध्ये जमीनीचा व्यवहार होता. यांच्या तीन बहिनींनी यांच्याविरुध्द दिवाणी दावे दाखल केले आहेत. दारु पिण्याचे कारण असेल तर त्या ठिकाणी कोणतेही दारु बनविण्याचे साधन किंवा दारुचे डबे वगैरे काही सापडले नाहीत. या प्रकरणातील फक्त गोविंद राघोजी डोनेराव (66) यांनाच अटक झाली. या प्रकरणात पोलीस उपनिरिक्षक अशोक उजगरे यांनी दोषारोप पत्र सादर केले होते. न्यायालयात हा सत्र खटला 156/2022 प्रमाणे चालला. या खटल्यात 10 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले.
या खटल्यातील फिर्यादी आणि आरोपीमध्ये झालेली मारहाणीची नोंद, घटनास्थळी दारु बनविण्याचे काही साहित्य जप्त नाही. फिर्यादी आणि मयतामधील जमीनीचा वाद या सर्व घटनांना अनुसरून आरोपीचे वकील ऍड. अनुभव डोनगे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय मानुन नांदेड जिल्हा न्यायालयाने खूनातील आरोपी गोविंद डोनेराव यांची मुक्तता केली आहे. या प्रकणातील फरार असलेले दोन गायकवाड पोलीसांनी आताच काही दिवसांपुर्वी अटक केले आहेत. त्यांच्याबद्दल स्वतंत्रपणे दोषारोप पत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत..
खून प्रकरणातील 66 वर्षीय व्यक्तीची मुक्तता
