आपत्तीच्या छायेत नृत्य; कंगना आणि रिजिजू यांच्या संवेदनशून्यतेचा चेहरा

हिमाचल प्रदेशात नैसर्गिक आपत्तींमुळे प्रचंड हानी झाली असताना, भारताच्या लोकसभेतील अभिनेत्री आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त खासदार कंगना राणावत या नृत्य करून आनंद व्यक्त करत होत्या. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री किरण रिजिजू देखील नृत्य करत होते. संपूर्ण हिमाचल प्रदेश नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त असताना हे दृश्य अनेकांना खटकले.

त्याच वेळी बातमी आली की मंडी जिल्ह्यात ढगफुटीमुळे अनेक झाडे पडली आणि सोळा लोकांचा मृत्यू झाला. विशेष बाब म्हणजे कंगना राणावत यांचा हाच मंडी मतदारसंघ आहे. जेव्हा त्यांनी अभिनय क्षेत्र सोडून राजकारणात प्रवेश केला होता, तेव्हा त्यांनी जनतेची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. पण त्यांच्या मतदारसंघात डझनभर मृत्यू झाले असताना त्या आनंदाने नृत्य करत होत्या, हे दुर्दैवी आणि दुःखद आहे.पृथ्वीच्या तांडवात मस्ती करण्याचा हा प्रकार काय योग्य मानायचा? मृत्यूच्या छायेत असा उत्सव साजरा करणं कितपत संवेदनशीलतेचं लक्षण आहे?

 

मंडीच्या व्यास नदी परिसरात सर्वाधिक नुकसान झाले आहे आणि याच भागाच्या खासदार आहेत कंगना राणावत. आश्चर्य म्हणजे, हिमाचल प्रदेश सध्या किती गंभीर स्थितीत आहे, याची जाणीव ना भाजपला आहे, ना त्यांच्या खासदारांना.२० जून ते ४ जुलै दरम्यान हिमाचलमध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे किमान ६२ ते ६९ लोकांचा मृत्यू झाला आहे. फक्त मंडी जिल्ह्यातच १३ मृत्यू आणि २९ लोक बेपत्ता आहेत. एकट्या या भागात इतकी भीषण परिस्थिती असताना त्या नृत्य करतात, हे किती असंवेदनशील आहे.हिमाचलमध्ये सध्या १०० पेक्षा अधिक लोक जखमी आहेत. अनेक रस्ते बंद झाले आहेत, पूल कोसळले आहेत, घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक भागांत अजूनही नुकसानीची मोजणी सुरू आहे. २८० ते ४००६ रस्ते भूस्खलनामुळे पूर्णपणे नष्ट झाले आहेत. शिमला-चंदीगड राष्ट्रीय महामार्गही बंद झाला आहे. सुमारे १५०० पेक्षा अधिक ट्रान्सफॉर्मर बंद पडले आहेत, ६३९ ठप्प झाले आहेत.

 

परंतु याचा कंगना राणावत यांना थांगपत्ताही नाही. म्हणूनच त्या नाचत आहेत. आणि आम्हीही त्यांचे आभार मानतो. दुःखाच्या छायेत आनंद साजरा करण्याचा वेगळाच “योग” त्यांनी साधला आहे.शिमला जिल्ह्यात पाच मजली इमारत कोसळली आहे, १५० हून अधिक घरे पडली आहेत. मंडी, कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यांतील परिस्थिती केवळ वर्णनात बसणारी नाही. अशा परिस्थितीत नृत्य करून सुट्टीचा आनंद घेणं,हेच जर राजकारण असेल, तर याला काय म्हणावं?

 

हिमाचल सरकारने शेकडो मदत शिबिरे उभारली आहेत. लाखो लोक तिथं थांबले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिस बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. हवामान विभागाने सात जुलैपर्यंत आणखी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे, विशेषतः शिमला, कुल्लू आणि मंडी जिल्ह्यांत.पण कंगना राणावत आणि किरण रिजिजू यांना याच्याशी काही घेणं-देणं नाही. त्यांना फक्त नृत्य करून जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, आणि तेच ते करत आहेत.राजकारण म्हणजे काय? कदाचित हेच. मृत्यूच्या छायेतही मस्ती शिकवणं, हीच त्यांची राजकीय शिकवण असावी.असा निष्कर्ष आर्टिकल १९ चे पत्रकार नवीन कुमार यांनी काढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!