पोलीस उपनिरीक्षक गोविंदराव सारजाबाई संभाजीराव मुंडे यांच्या गौरवशाली सेवानिवृत्तीप्रसंगी शुभेच्छा…
“कर्तृत्व हाच खरा ओळखीचा शेरा!” – गोविंदराव मुंडेंचा जीवनप्रवास
३७ वर्षे, ११ महिने आणि ११ दिवस…. हा केवळ एका सेवाकालाचा आकडा नाही, तर एका साध्या खेडूत घरातून आलेल्या दबंग आणि निष्कलंक पोलीस अधिकाऱ्याच्या धगधगत्या प्रवासाची साक्ष आहे. पोलीस उपनिरीक्षक गोविंदराव मुंडे ज्यांच्या वर्दीवर कधीही शिंतोडाही लागला नाही, अशा कर्मठ आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याचा हा गौरवशाली शेवटचा टप्पा.
पिंपळाची वाडी, ता. कंधार, जि. नांदेड या छोट्याशा गावात ५ जून १९६७ रोजी उमललेले गोविंदराव हे फुल आज एका झाडासारखे बहरले आहे, ज्याच्या सावलीत असंख्यांना आधार मिळाला. त्यांच्या आई-वडिलांनी (सारजाबाई व संभाजीराव) आपल्या लेकराच्या संघर्षाचा संपूर्ण प्रवास डोळ्यांनी पाहिला आणि आता सेवानिवृत्तीचा सोहळा त्यांच्या उपस्थितीत अनुभवत आहेत, ही बाबच “पोरगं मोठं झालं ते आईच्या ओंजळीवर…” या म्हणीप्रमाणे आहे.
1983-84 मध्ये दहावीची परिक्षा उत्तीर्ण केली. 21 जुलै 1987 रोजी त्यांनी पोलीस दलात प्रवेश केला. यापुर्वी त्यांनी 12 वी पास करण्याचा प्रयत्न केला. परंतू यश आले नाही. त्यामुळे ते पोलीस दलात सहभागी झाले. 1988 मध्ये आपले प्रशिक्षण पुर्ण करून 1990 पर्यंत गोविंदराव संभाजीराव मुंडे यांनी पोलीस मुख्यालयात आपल्या सेवा दिल्या. 1990 मध्ये संगमवाडी पोस्ट शेकापूर येथील शोभाताई यांच्यासोबत त्यांचे लग्न संपन्न झाले. पुढे आपल्या सांसारीक जीवनाच्या उद्यानात एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोन आपत्यांना जन्म दिला. 1990 ते 1996 त्यांनी इतवारा पोलीस ठाण्यात सेवा बजावली. 1996 ते 2000 या दरम्यान पोलीस नाईक हे पद प्राप्त करून धर्माबाद येथे सेवा दिली. सन 2000 मध्ये ते अर्धापूर येथे आले. त्यानंतर 2004 मध्ये ते पुन्हा पोलीस मुख्यालयात आले. 2006 मध्ये स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत झाले. 2010 मध्ये जिल्हा विशेष शाखेत काम केले. 2015 मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आपल्या सेवेच्या कला दाखवल्या. 2017 मध्ये गुरुद्वारा सुरक्षा पथकात नेमणूक झाली आणि सन 2019 पासून ते नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत आपल्या कलाकाऱ्यांना दाखवत काम करत होते. सन 2022 मध्ये ते पोलीस उपनिरिक्षक झाले आणि आता स्थानिक गुन्हा शाखेतूनच पोलीस उपनिरिक्षक या पदावरून जीवनाची 37 वर्ष 11 महिने 11 दिवस पोलीस दलात सेवा करून सेवानिवृत्त होत आहेत.
आपल्या जीवनातील प्रसंग आठवून सांगतांना मी छोट्या गावातील रहिवासी असल्यामुळे मला पोहणे ही कला येत होती. मी पोलीस दलात आलो तेेंव्हा गोदावरी नदीला मोठ-मोठे पुर येत असायचे. नांदेड शहरात व अनेक गावांमध्ये पुराचे पाणी साचायचे अशा परिस्थितीत जवळपास 400 ते 500 लोकांना मी अडकलेल्या पाण्यातून बाहेर काढल्याचे त्यांनी आठवणीने सांगितले. आपल्या जीवनातील कामकाजाबद्दल बोलतांना गोविंदराव मुंडे म्हणाले की, अर्धापूर येथे एकदा जातीय दंगल घडली. त्यावेळी आम्ही काहीच लोक पोलीस ठाण्यात बसलेले होतो आणि दंगलीची माहिती मिळताच आम्ही त्या दिशेने सुसाट पळत निघालो. प्रत्यक्षात त्या ठिकाणी दगडफेक होते होती. पण मी आणि माझे काही सहकारी तेथे पळत येत आहेत हे पाहताच. दगडफेक करणारे समाजकंटक पळून गेले आणि त्यामुळे मोठे नुकसान वाचले. त्यावेळी पोलीस अधिक्षक अमिताभ गुप्ता हे होते. त्याच दिवशी पोलीस अधिक्षक कार्यालयात मासिक गुन्हे परिषद सुरू होती. पोलीस अधिक्षक अमिताभ गुप्ता आणि इतर अनेक अधिकारी अत्यंत जलदगतीने अर्धापूर येथे पोहचले. त्यावेळी जनतेतील लोकांनी गुप्ता साहेबांना सांगितले की, मुंडे आणि त्यांचा सहकारी शकील यांच्यामुळेच ही दंगल आणि दगडफेक थांबली आहे. त्यावेळी पोलीस अधिक्षक अमिताभ गुप्ता यांनी माझ्याकडे पाहुन केलेले स्मित हास्य माझ्यासाठी लाख मोलाचे होते.
आपल्या जीवनातील उत्कृष्ट पोलीस निरिक्षक म्हणून गोविंदराव मुंडे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुरेंद्र मानधने यांचा उल्लेख करतात. गोविंदराव सांगतात की, माझ्या बोलण्याची लकब आणि लिहिण्याची पध्दत पाहिल्यानंतर पोलीस निरिक्षक सुरेंद्र मानधने यांनी मला इतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात नियुक्त केले होते. मोठे अधिकारी आपली कशी दखल घेतात याची एक आठवण सांगतांना गोविंदराव मुंडे यांनी सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण यांचा उल्लेख केला. गोविंदराव मुंडे हे धर्माबादमध्ये कार्यरत असतांना व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण धर्माबाद पोलीस ठाण्याच्या तपासणीसाठी आले होते. त्यावेळी पोलीसांचे प्रश्न मांडतांना मी लक्ष्मीनारायण सरांसमोर पोलीस दलाच्या लोकांना पिण्याचे पाणी योग्य मिळत नाही अशी व्यथा मांडली होती. त्यानंतर पोलीस अधिक्षक व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी पोलीस लाईन धर्माबाद येथे बोअर पाडून सर्व पोलीसांना त्यातून पाईपलाईनद्वारे पाणी उपलब्ध करून दिले होते. त्यानंतर जवळपास एक वर्षाने मी साधना प्रशिक्षणासाठी नांदेड पोलीस मुख्यालयात आलो असतांना व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण एकदा आले तेंव्हा मला विचारले की, मुंडे तुमचे काम झाले काय ? मी हो सर धन्यवाद असे म्हणालो. त्या साधना प्रशिक्षणात उपस्थित असणाऱ्या इतर प्रशिक्षणार्थींसमोर व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण यांनी मला नावाने बोलून विचारणा केली. त्यामुळे माझ्या सहकारी प्रशिक्षणार्थींनी मला प्रश्न विचारले की, बाबा तुझी तर साहेबांची थेट ओळख आहे. तेंव्हा हे ऐकून माझी छाती दोन इंचांनी फुगली होती.
शिकवण आणि शौर्याचा वारसा
दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर २१ जुलै १९८७ रोजी पोलीस दलात प्रवेश करणाऱ्या गोविंदराव मुंडे यांनी, “प्रयत्न करणाऱ्यांची हार नसते” हे आपल्या जीवनातून सिद्ध केले. पोलीस प्रशिक्षणानंतर त्यांनी ज्या विविध विभागात कार्य केले ते केवळ कामाचे ठिकाण नव्हते, तर त्यांच्या कर्तृत्वाच्या रणभूमी होत्या.
अर्धापूरची जातीय दंगल असो की नांदेडमधील पूरस्थिती; मुंडे यांनी “प्राण गेला तरी चालेल, पण मान गेला नाही पाहिजे” या तत्वाने काम करत, धैर्याने संकटांना सामोरे गेले. अशा घटनांमध्ये त्यांनी ५०० हून अधिक लोकांचे प्राण वाचवले, हा त्यांच्यातील खऱ्या अर्थाने ‘जनसेवक’ असलेल्या पोलीसाची ओळख देतो.
नेतृत्वाची जडणघडण
सेवा करत असताना त्यांनी फक्त गुन्हेगारांना पकडले नाही, तर समाजातील अनेक पती-पत्नींचे नातेही सौहार्दाने पुन्हा एकत्र केले. ही “मन वळविण्याची शक्ती तलवारीपेक्षा मोठी असते” याची प्रचिती देणारी गोष्ट आहे.
वि.वि. लक्ष्मीनारायण,अमिताभ गुप्ता, सुरेंद्र मानधने यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी त्यांच्या कामगिरीची दखल घेतली, हेच त्यांच्या कार्यशक्तीचे प्रमाण आहे. लक्ष्मीनारायण सरांनी त्यांच्या मागणीवरून पोलीस दलासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, हे “माणूस घडतो त्याच्या वागण्यातून” याचे आदर्श उदाहरण आहे.
हृदयस्पर्शी आठवणी व अनुभव
गांजाच्या आरोपीमुळे हवेत उडालेलं लेकरू, मंदिराजवळ सापडलेली मटनाची पिशवी, उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श करून जळालेला अर्जविरोधी — हे सगळे प्रसंग केवळ तपशील नाहीत, तर त्यांच्या धैर्याची, संवेदनशीलतेची आणि माणुसकीची साक्ष देणारे “हृदयद्रावक” अनुभव आहेत.
मनाची खंत, आणि सेवाभावाची सलगता
पोलीस अंमलदार शिवाजी शिंदे यांच्या खूनाचा गुन्हेगार अजूनही फरार असणे, ही खंत त्यांनी मनाशी ठेवलेली आहे, कारण “कर्तव्यपूर्तीचे समाधान असले तरी अन्यायाविरुद्ध असहायता खूप बोचते.”
सेवा संपली पण समाजसेवा सुरुच राहो…
आज ते सेवानिवृत्त होत आहेत, पण त्यांच्या अनुभवाचा खजिना समाजासाठी अमूल्य आहे. गोविंदराव मुंडे हे “वृत्तीने पोलीस” होते आणि “सेवेला निवृत्ती नसते” हे त्यांनी आयुष्यभर दाखवून दिले.
वास्तव न्युज लाईव्ह परिवारातर्फे आम्ही पोलीस उपनिरीक्षक गोविंदराव मुंडे यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या आई-वडिलांचा आशीर्वाद त्यांना दीर्घकाळ लाभावा, हीच प्रार्थना. त्यांनी सेवा केली ते पोलीस दल आता मागे पडले असले, तरी समाजासाठी त्यांचा मार्गदर्शक अनुभव कायम पुढील पिढीच्या मार्गदर्शनासाठी कार्यरत राहो, हीच सदिच्छा.
“आठवणींच्या सावलीत विसावलेले हे कर्तृत्व, आज नव्या वाटेच्या दिशेने पाऊल टाकत आहे…!”