नांदेड – प्रसिद्ध बालसाहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषद नांदेड शाखेच्या वतीने आज त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे नांदेड शाखा अध्यक्ष बालाजी इबितदार, कार्यवाह प्रा. महेश मोरे , सहकार्यवाह राम तरटे, ललित कला प्रतिष्ठानचे मुधोळकर , सौ. मथूताई सावंत आदींची उपस्थिती होती.
सुप्रसिद्ध बालकवी तथा लेखक, समीक्षक डॉ. सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या कविता संग्रहाला यावर्षीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीचा पुरस्कार नांदेडकरांना मिळाल्यामुळे मराठवाड्यातील साहित्यप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नांदेड जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात पहिल्यांदाच बालसाहित्याला डॉ. सुरेश सावंत यांच्या रूपाने साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे आणि ही नांदेडकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे जिल्हा अध्यक्ष बालाजी इबितदार यांनी यावेळी सांगितले . भविष्यातही डॉ. सुरेश सावंत यांच्या हातून बालसाहित्यसह मराठी साहित्याला समृद्ध करणाऱ्या साहित्याचे लेखन व्हावे अशी सदिच्छाही यांनी यावेळी व्यक्त केली.