पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिफ मुनीर यांनी नुकतेच भारतावर आतंकवाद प्रायोजित करण्याचा आरोप केला. स्वतः आतंकवादाचा जन्मदाता असलेल्या देशाने भारतासारख्या आतंकपीडित राष्ट्रावर असा आरोप करणे, ही केवळ धूर्तपणा नव्हे, तर गंभीर पातळीवरची विकृती आहे. ज्या देशाने ओसामा बिन लादेनला लपवून ठेवले, संयुक्त राष्ट्रसंघाने ‘दहशतवादी’ ठरवलेल्या अनेकांचा खुलेआम बचाव केला, अशा पाकिस्तानकडून भारतावर आरोप होणे म्हणजे हास्यास्पद विडंबन आहे.
मुनीर यांनी भारताविरोधात कुठलाही ठोस पुरावा न देता केवळ प्रचारकी भाषा वापरून भारताला ‘सर्वात मोठा दहशतवाद प्रायोजक देश’ ठरवले आहे. त्यांनी अफगाणिस्तानशी संबंध सुधारल्याचे सांगून भारतावर आक्षेप घेतले की, ‘भारताने फितना अल हिंदुस्थान, सूचना अलखवाडी आणि अलखवाडीज यांसारख्या आतंकी गटांना पनाह दिली आहे’. हे आरोप केवळ बेबुनियादीच नाहीत, तर भारताच्या प्रतिमेला बदनाम करण्याचा हेतूपूर्ण प्रयत्न आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्रालय मात्र या आरोपांबाबत मौन बाळगत आहे. प्रवक्ते जयस्वाल यांनी स्पष्ट सांगितले की, ‘‘मी या वक्तव्यावर काहीही बोलणार नाही. भारत आणि अमेरिकेचे संबंध मजबूत असून, ते लोकशाही मूल्यांवर आधारित आहेत.’’ मात्र दुसरीकडे, पाकिस्तानचा शत्रुत्वाचा सूर दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याचवेळी पाकिस्तानचे नेते अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये बसून आपले संबंध मजबूत करत आहेत.पाकिस्तानने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताकडून मार खाल्ला, तरीही तो सुधारलेला नाही. आता पुन्हा एकदा पीओकेमध्ये (पाक अधिकृत काश्मीर) दहशतवादाच्या हालचालींना वेग आला आहे. नवीन लॉन्चिंग पॅड तयार केले जात आहेत. बीएसएफकडून मिळालेल्या माहितीनुसार, एलओसीवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
बहावलपूर येथे झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन, टीआरएफ या संघटनांचे प्रतिनिधी, आयएसआयचे वरिष्ठ अधिकारी, आणि पाकिस्तान लष्कराचे कमांडर सहभागी होते. या बैठकीत नष्ट झालेल्या दहशतवादी कॅम्पांना पुन्हा सक्रिय करण्याची रणनीती ठरवण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, हे कॅम्प अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केले जात आहेत जेणेकरून भारताच्या गुप्तचर यंत्रणांना त्यांच्या हालचालींचा मागोवा घेता येणार नाही. यावेळी दहशतवाद्यांचे प्रशिक्षण पूर्ण होताच त्यांना त्वरित एलओसी ओलांडून भारतात पाठवण्याची योजना आखली गेली आहे.पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांची ही युती, दहशतवाद पुन्हा एकदा फोफावण्याची तयारी करत असल्याचे स्पष्टपणे दर्शवते. यासाठी जागतिक बँक व एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून मिळणारा निधी वापरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. धार्मिक संस्थांच्या नावाखाली हे पैसे दहशतवादी कॅम्प उभारण्यासाठी वापरले जात आहेत.
लोणी, पुखवाल, भैरवनाथ, अफजलपूर, छोटा शप्पथ, जंगलोरा अशा अनेक ठिकाणी नव्याने लॉन्चिंग पॅड उभारले जात आहेत. हे सर्व पाहता, सापाला कितीही दूध पाजले तरी तो चावल्याशिवाय राहत नाही, हेच अधोरेखित होते.भारताने सॅटेलाइट फोटोंसह जगासमोर पुरावे ठेवून पाकिस्तानचा दुटप्पीपणा उघड करावा आणि कठोर कारवाईचा इशारा द्यावा, अशी मागणी पत्रकार अशोक वानखेडे यांनी केली आहे. आपल्या राजकीय नेत्यांमध्ये हे राजनैतिक धैर्य कधी निर्माण होणार, हा खरा प्रश्न आहे.