हिमायतनगरच्या पोलीस अंमलदाराची नांदेडमध्ये जबरदस्त कामगिरी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीसांनी शहरातील दत्तनगर भागात ओव्हरब्रिजवळ, एमआरएफ शोरुमच्या बाजूला तीन जणांकडून डोडा हा अंमली पदार्थ पकडला आहे. हिमायतनगरमध्ये नियुक्तीस असलेला पोलीस अंमलदार राजदिपसिंघ यांच्या विशेष मेहनतीने हा डोडा पदार्थ पकडण्याचा महत्वपुर्ण घटनाक्रम घडला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी तीन जणांविरुध्द तिन वेगवेगळे गुन्हे दारु बंदी कायद्यानुसार दाखल केले आहेत.
नांदेडच्या दत्तनगर भागातील ओव्हरब्रिजवळ, एमआरएफ शोरुमच्या शेजारील मोकळ्या जागेत सकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान इतवारा पोलीस पथकाने तीन जणांना पकडले. त्यात ज्यांच्याजवळ डोडा होता ते जसबिरसिंघ अमरिकसिंघ दत्त (44) रा.दिलीपसिंघ कॉलनी वजिराबाद नांदेड, जागीरसिंघ हरीसिंघ रामगडीया(52) रा.भगतसिंघ रोड नांदेड, गुरप्रितसिंघ बलवंतसिंघ रंधावा(31) रा.नंदीग्राम सोसायटी नांदेड या तिन जणांना पकडले. त्यावेळी पोलीसांनी आरोपींसह एक फोटो सुध्दा घेतला. त्यात इतवारा पोलीस पथक, शिवाजीनगर पोलीस पथक यांच्यासह एक विशेष व्यक्ती दिसत आहे त्यांचे नाव सरदार राजदिपसिंघ असे आहे. यांचे नियुक्ती हिमायतनगर पोलीस ठाण्यात आहे. परंतू सलग्न या नावाखाली(सलग्न हा शब्द पोलीस महासंचालक कार्यालयाने रद्दबातल ठरवला असला तरी) ते अपर पोलीस अधिक्षक भोकर यांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. परंतू आजच्या कामगिरीमध्ये पोलीस ठाणे शिवाजीनगर आणि पोलीस ठाणे इतवारा यांच्या पथकासह ते फोटोत दिसत आहेत. म्हणजे असे म्हणता येईल की, यांच्याच मेहनतीने डोडा विकणाऱ्या तिन जणांना पकडण्यात आले.
या संदर्भाने घडलेला घटनाक्रमाची जागा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात असल्यामुळे पोलीस अंमलदार लिंबाजी राठोड, संजय येमलवाड आणि देवसिंग सिंगल यांच्या तक्रारीवरील गुन्हा क्रमांक 247, 248, 249/2025 दारु बंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे तीन जणांविरुध्द तीन गुन्हे दाखल करण्यात आले. यापुर्वी डोडा या पदार्थावर कार्यवाही झाल्यानंतर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. यालाच म्हणतात पोलीस खाते करील ते होईल. या सर्व तिन प्रकरणांचा तपास शिवाजीनगरचे पोलीस उपनिरिक्षक उमेश कदम यांच्याकडे देण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार राजदिपसिंघ यांच्या मेहनतीने ही कार्यवाही घडली ही प्रशंसनिय बाब आहे. पोलीस अधिकारी किंवा पोलीस अंमलदार नियुक्तीस कोठे आहे हे महत्वाचे नाही त्याला पोलीस अधिक्षक कोणते काम देतात हे जास्त महत्वाचे आहे. अनेक वेळेस मुंबई येथून पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार येतात आणि नांदेडमध्ये कार्यवाही करतात. त्यांना पोलीस महासंचालकांनी पाठविलेले असते. नांदेडचे पोलीस अधिक्षक हिमायतनगरच्या पोलीस अंमलदाराला नांदेडमध्ये कार्यवाही करण्यासाठी पाठवू शकतात यात गैर काय? प्रकरण सकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान घडले असले तरी या आरोपींना पकडल्याची माहिती किंवा त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्याची कार्यवाही आज दुपारी 12.30 वाजता अभिलेखाप्रमाणे घडली. यालाच म्हणतात पोलीस खाते करील ते होईल. यामुळे अशा करील ते होईल या घटनांना आव्हान न देणे चांगले. हा संदर्भ आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी लिहिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!