मुखेड(प्रतिनिधी)- मुखेड शहरातील नांदेड मर्चेंट बॅंकेच्या बाहेर चोरट्याने भरदिवसा दुचाकीची डिक्की काढून त्यातील 7 लाख 70 हजार रुपयांवर डल्ला मारल्याची घटना काल 18 जून रोजी सकाळी 11: 30 वा. घडली.
फिर्यादी गोविंद स्टोन क्रेशर वर्ताळा तांडा येथील व्यवस्थापक देवीप्रसाद संभाजी वडजे हे सकाळी 11 वाजता मुखेड शहरातील एसबीआय बॅंकेत जाऊन 7 लाख 70 हजार रुपये उचलले. त्यात 100 व 200 च्या नोटा असल्याने बदलून घेण्यासाठी आपल्या मोटारसायकलने (एमएच 26 ए एक्स 6796) शहरात असलेल्या नांदेड मर्चट बॅंकेसमोर मोटारसायकल उभी करून 500 रुपयांच्या नोटा बदलून मिळेल का ? म्हणून विचारण्यासाठी बॅंकेत गेले होते. बॅंकेतुन परत आल्यावर डिक्कीतील रक्कम नसल्याचे समजले.यावेळी आजूबाजूच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता 7 लाख 70 हजार रुपयांची पिशवी दोन युवक मोटार सायकलवर येऊन डिक्कीतून पिशवी काढून पळ काढताना दिसत आहेत. या प्रकरणी फिर्यादी देवीप्रसाद वडजे यांच्या फिर्यादीवरून मुखेड पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम 303 (2), 3 (5) अन्वये दोन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंचक फड हे करीत आहेत. घटनेचे गांभीर्य पाहता देगलूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी यांनी घटनास्थळी भेट दिली व नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेचे टीम यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
मुखेडात भरदिवस चोरट्याने मारला 7 लाखावर डल्ला
