नांदेड,(प्रतिनिधी)-पोलीस विभागातील सर्वसाधारण बदल्यांना आता सुमारे एक महिना पूर्ण होत आला आहे. परंतु, या बदल्यांत अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहेत. नियमानुसार, बदल्या झालेल्या पोलीस अंमलदारांना त्यांच्या इच्छेनुसार नेमणूक न झाल्यास पुन्हा अर्ज करण्याचा अधिकार असतो. मात्र, नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार हे काही निवडक पोलीस अंमलदारांना वारंवार त्या-त्याच ठिकाणी नियुक्त करत असल्याचं चित्र दिसून येत आहे.
उदाहरणार्थ, काही महिन्यांपूर्वी वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलिसाची बदली भाग्यनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्याचप्रमाणे, अलीकडेच नऊ वर्षांनंतर अर्धापूर येथून नांदेडला काही दिवसांसाठी आलेल्या महिला पोलीस अंमलदार अश्विनी किशन गोडबोले (बकल नंबर 2954) यांची पुन्हा एकदा अर्धापूर येथेच बदली करण्यात आली आहे.
या संदर्भात ‘जावक क्रमांक आस्था -2 /1074/विनंती/बदली- पो.अंमलदार 2025 नुसार त्यांची बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्या आधी नांदेड पोलीस मुख्यालयातून त्यांना जीपीयू विभागात पाठवण्यात आले होते, आणि आता पुन्हा अर्धापूर येथे नियुक्ती देण्यात आली आहे. यावरून स्पष्ट होते की बदली केवळ दाखवण्यासाठी झाली होती.
तसेच,धनंजय दत्तात्रय कुंभारवाड यांची भाग्यनगर पोलीस ठाण्यातून शहर वाहतूक शाखेत बदली झाली होती, पण काही दिवसांतच पुन्हा त्याच भाग्यनगर पोलीस ठाण्यात नेमणूक झाली. धनंजय कुंभारवाड हे 9 वर्षे विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांची बदली ही अशाच रीतीने ‘दाखवण्यासाठी’ करण्यात आल्याचे या दुसऱ्या प्रकरणावरून दिसते. वाहतूक शाखेत काही दिवसांची नियुक्ती, आणि नंतर पुन्हा भाग्यनगर येथेच.
या सर्व प्रकरणांवरून असे स्पष्ट होते की, एखाद्या ठिकाणी दीर्घकाळ कार्यरत असलेल्या अंमलदारांना पुन्हा-पुन्हा त्याच ठिकाणीच नेमणूक दिली जात आहे. ही ‘परंपरा’ सध्या पोलीस दलात चर्चेचा विषय बनली आहे.
अनेक पोलीस अंमलदारांनी दुसऱ्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी अर्ज केलेले आहेत अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे,. मात्र, त्यांचा विचार अद्याप झालेला नाही. विशेष म्हणजे, ‘सलग्न’ अशी नेमणूक शासनाने रद्द केली असूनही काही ठिकाणी हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. शासन नियमानुसार, कोणत्याही ठिकाणी संलग्न नोकरी दिली जाणे अपवादात्मक परिस्थितीत मर्यादित कालावधीसाठीच मान्य आहे.
महिला पोलीस अंमलदार अश्विनी गोडबोले यांना पुन्हा अर्धापूर पोलीस ठाण्यात नियुक्त करून पोलीस अधीक्षकांनी जेवढा ‘रस’ दाखवला आहे, तोच रस इतर अंमलदारांच्या अडचणी सोडवण्यासाठी दाखवला तर दलातील नाराजी लक्षणीय स्वरूपात कमी होईल. हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे — न्याय सर्वांना सारखा का नाही?