नांदेड(प्रतिनिधी)-पत्नी पिडीत पुरूषांकडून वटपौर्णिमेच्या पुर्वसंध्येला पिंपळ पौर्णिमा दरवर्षी साजरी करण्यात येते. यावेळी पत्नी पिडीत पुरूषाकडून पिंपळाच्या झाडाची पुजा करून त्याला उलट्या फेऱ्या मारण्यात येतात. पुरूषांवर होणाऱ्या अन्याया विरुध्द आवाज उठवून स्त्रियांच्या बाजूने असलेल्या एकतर्फी कायद्यात बदल करावा. महिलांप्रमाणेच पुरूषांसाठी सुध्दा आयोग स्थापन करावा आणि सामाजिक व न्याय व्यवस्था बदलण्याची मागणी या पिंपळ पौर्णिमेच्या दिवशी करण्यात येत असते. हा कार्यक्रम पत्नी पिडीत आश्रम करोडी येथे दरवर्षी साजरा होतो. तो यंदाही झाला.
वटपौर्णिमा हा स्त्रियांसाठी महत्वाचा सण मानला जातो. यालाच वटसावित्री असे देखील म्हणतात. या दिवशी महिला वटवृक्षाची पुजा करून सात जन्मापर्यंत हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. या वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी दरवर्षी पत्नी पिडीत पुरूष आश्रमात पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात येते. त्या दिवशी आश्रमात पत्नी पिडीत पुरूष पिंपळाच्या झाडाची पुजा करतात आणि पुरूषांवर होणाऱ्या अन्यायाविरुध्द आणि एकतर्फी न्याय व्यवस्थेच्या विरोधात साकडे घालतात.
या कार्यक्रमात पत्नी पिडीत आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. भारत फुलारे, उपाध्यक्ष सुरेश फुलारे, सचिव चरणसिंग गुसिंगे, सोमनाथ मनाळ, एकनाथ राठोड, भाऊसाहेब साळुंके, प्रविण कांबळे, श्रीराम तांगडे, संजय भांड, वैभव घोळवे, दिनेश दुधाड, उमेश दुधाड यांच्यासोबत अनेक पत्नी पिडीत पुरूष उपस्थित होते.
पुरूष आत्महत्यांचा आकडा धोकादायक
पुरूष हा समाजाचा आर्थिक व सामाजिक कणा आहे. मात्र त्याच्या वेदनांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे संपुर्ण कुटूंब व्यवस्थेला अंधारात पाठविण्यासारखे आहे आणि अशा घटनांमुळेच पुरूषांचा आत्महत्या आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दिल्लीतील एनसीआरबीचा अहवाल 2024 नुसार सन 2023 मध्ये 1 लाख 20 हजार विवाहित पुरूषांनी आत्महत्या केल्या आहेत. हा आकडा विवाहित महिलांच्या आत्महत्या संख्येपेक्षा तीन पट्टीने अधिक आहे. पुरूषांचा आवाज दाबण्याऐवजी त्यांना ऐकून घेणे, कायद्यात बदल घडविणे आणि सामाजिक सुधारणा करणे यासाठी हे एक पाऊल ठरेल असे ऍड. भरत फुलारे यांनी सांगितले.
पुरूष हक्कासाठी संस्थेकडून असणाऱ्या मागण्या
पुरूष आयोगाची तातडीने स्थापना करावी, खोट्या तक्रारीविरोधात लिंगनिरपेक्ष कार्यवाही व्हावी, प्रत्येक जिल्ह्यात पुरूष तक्रार निवारण केंद्र सुरू करावे, राज्याच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात पुरूष दक्षता कक्ष असावा, कौटूंबिक वादांचे प्रकरण एका वर्षात निकाली काढण्याचे बंधन असावे या प्रमुख मागण्यात मांडण्यात आल्या.
पत्नी पिडीत पुरूषांच्या पिंपळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या
