नांदेड -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२५ या परीक्षा चालू आहेत. कंधार (बाळंतवाडी) येथील अध्यापक महाविद्यालयामध्ये कंधार फार्मसी कॉलेजचे बी.फार्मसी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी परीक्षा देत होते. सदर परीक्षा केंद्रावर ७ मे रोजी विद्यापीठाचे विशेष कार्यासन अधिकारी, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता, पीपल्स महाविद्यालयाचे डॉ. अमोल काळे यांनी अचानकपणे परीक्षा केंद्रास भेट दिली. या दरम्यान परीक्षा केंद्रावर सर्व विद्यार्थी बिनधास्त कॉपी करत असताना आढळले. ही बाब अत्यंत गंभीररित्या मा. कुलगुरू महोदयांनी घेतली आहे. आणि तात्काळ सदरचे परीक्षा केंद्र रद्द केले आहे.
सदर कारणामुळे मा. कुलगुरू महोदयांच्या आदेशान्वये कंधार (बाळंतवाडी) येथील अध्यापक महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले आहे. यामुळे दि. ८ मे पासून कंधार येथील फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही लोहा येथील डी.के. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे घेण्यात येणार आहे.
तरी याबाबतची विद्यार्थ्यांनी बदल लक्षात घेऊन दि. ८ मे पासून लोहा येथील डी.के. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे उपस्थित राहून परीक्षा द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी केले आहे.
