नांदेड (प्रतिनिधी) – बिलोली येथे काठीने मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 11 हजार रूपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
प्रकाश बळीराम कुरूनोर यांना दि. 31 मे 2022 रोजी बिलोली शिवारात संजय तुकाराम बिलोलीकर (लाठकर) यांच्या शेतात दत्ता बाबाराव मदनूरे वय 41, यांनी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास पिण्याचे पाणी घ्यायला आला म्हणून काठीने मारहाण करून डोके फोडले आणि जिवे मारण्याची धमकी दिली. यानुसार बिलोली पोलिसांनी गुन्हा क्र. 130/2022 दाखल केला. बिलोली न्यायालयात हा खटला आरसीसी 93/2022 प्रमाणे चालला. या खटल्यात एकूण सहा साक्षीदारांनी आपले जबाब नोंदविले. सरकारी वकील ऍड. गिरीश सुरेशराव मोरे यांनी सरकार पक्षाच्यावतीने बाजू मांडली. युक्तीवाद ऐकून बिलोलीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दत्ता बाबाराव मदनूरेला भादंविच्या कलम 324 प्रमाणे 10 हजार रूपये रोख दंड आणि कलम 323 प्रमाणे 1 हजार रूपये रोख दंड अशी ठोठावली. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार मारोती मुद्देमवार यांनी केला होता.