नांदेड(प्रतिनिधी)-जय श्री राम, जय जय श्रीरामच्या घोषणांनी नांदेड दुमदुमले. आज चैत्र शुध्द नवमी अर्थात प्रभु श्री रामचंद्राचा जन्मोत्सव दिन आज सकाळपासूनच प्रभु श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. दुपारनंतर अनेक वर्षांपासून निघणारी श्रीरामचंद्रजींची मिरवणूक वृत्तलिहिपर्यंत अर्ध्यारस्त्यात आहे.
आज सकाळपासूनच भगवान श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी लोकांनी जुना नांदेड भागातील गोदावरी नदी काठी असलेल्या राम मंदिरात गर्दी केली. तसेच जुना मोंढा भागात असलेल्या राम मंदिरात सुध्दा भाविकांची रिघ लागली होती. भये प्रगट कृपाला दिन दयाला कौशल्या हितकारी…या भगवंतांसाठी तयार असलेल्या सुतीने लोकांनी प्रभुसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. दुपारी 12 वाजता मंदिरांमध्ये भगवान श्री रामाची आरती करण्यात आली आणि त्यानंतर प्रसाद वाटप झाला.
गेल्या 14 वर्षापासून प्रसिध्द असलेली रामजन्मोत्सव मिरवणूक शहरातील रेणुका मातामंदिरासमोरून निघाली. त्यात अनेक ढोल ताशे पथक, अनेक डी.जे. वाजत होते. युवा मंडळे आपला आनंद व्यक्त करत होते. ढोल ताशे वाजवणाऱ्यांमध्ये युवतींचा सुध्दा समावेश होता. महिला मंडळ सुध्दा अत्यंत उत्साहात या मिरवणूकीत सहभागी झाले होते. मिरवणूकीत विविध देखावे तयार करण्यात आले होते. सोबतच आहिल्यादेवी होळकर, श्री. गुरूगोविंदसिंघजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यविर विनायक दामोधर सावरकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास महाराज यांच्यासह अनेक संत पुरूषांचे फोटो लावण्यात आले होते. अत्यंत उत्साहात ही मिरवणूक वृत्तलिहिपर्यंत वजिराबाद चौकात पोहचली होती. या मिरवणूकीतील एका पालखीमध्ये भगवान श्री राम, माता सिता, लक्ष्मण आणि भक्त हनुमान यांची मुर्ती आकर्षक दिसत होती. या मिरवणूकीत शांतता राहावी आणि कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होवू नये म्हणून पोलीसांनी अत्यंत टप्या-टप्यात चोख बंदोबस्त लावला होता. शिवाजीनगर भागात तर लोखंडी भिंत तयार करण्यात आली आहे.
महिलेचे मंगळसुत्र तोडले
महाविर चौकाच्या आसपास गर्दीचा फायदा घेवून रामजन्मोत्सव मिरवणूकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या बाहेरगावच्या पती-पत्नी आणि त्यांचे एक लहान बालक या मिरवणूकीच्या गर्दीत सहभागी झाले होते आणि गर्दीचा फायदा कोणी तरी चोरट्याने घेतला आणि महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेले. महिलेचा आक्रोश पाहता तिची काय अवस्था झाली असेल ही लिहिण्याची ताकत सुध्दा आमच्या लेखणीत नाही. हा प्रकार आम्ही स्वत: पाहिलेला आहे. या व्यतिरिक्त अजून काय-काय घडले या संदर्भाची माहिती वृत्तलिहिपर्यंत प्राप्त झालेली नव्हती.