नांदेड(प्रतिनिधी)-इस्लापूर पोलीसांनी रिठ्ठा ता.किनवट येथे दोन ट्रॅक्टर ट्रॉली पकडल्या. त्यामध्ये अवैध पध्दतीने भरलेली वाळू होती. इस्लापूर पोलीसांनी दोन ट्रक्टर आणि वाळू असा 8 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अंमलदार ओमप्रकाश लक्ष्मण डिडेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस ठाणे इस्लापूरच्या हद्दीत 22 मार्च रोजी गस्त करत असतांना पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार हे मौजे रिठ्ठा ता.किनवट या ठिकाणी पोहचले असतांना मौजे भंडरवाडी या दिशेकडून येतांना दोन ट्रक्टर दिसले. त्या ट्रॅक्टरांना थांबवून त्यांची तपासणी केली असता एका ट्रॅक्टरवर एम.एच.26 बी.क्यु. 1033 असा क्रमांक होता. दुसरा ट्रॅक्टर बिनानंबरचा होता. या दोन्ही ट्रॅक्टरमध्ये भरलेल्या वाळू संदर्भाने ते समाधानकारक उत्तर देवू शकले नाहीत. त्यामुळे त्यातील चालक अमर मारोती केंद्रे (26) रा.भंडारवाडी ता.किनवट आणि गिरजप्पा श्रीरंग नागरगोजे (32) रा.पिंपरी ता.किनवट या दोघांविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) आणि महाराष्ट्र गौण खनिज अधिनियम कलम 48 प्रमाणे गुन्हा क्रमांक 32/2025 दाखल करण्यात आला आहे. दोन ट्रॅक्टर आणि त्यातील वाळू असा 8 लाख 30 हजारांचा मुद्देमाल या प्रकरणी जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही इस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक उमेश भोसले, पोलीस उपनिरिक्षक अतुल डाके आणि पोलीस अंमलदार ओमप्रकाश डिडेवार यांनी केली आहे.
इस्लापूर पोलीसांनी अवैध वाळूचे दोन ट्रक्टर पकडले
