नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने दि. २८ व २९ मार्च रोजी खुल्या राज्यस्तरीय वक्तृत्व व काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या प्रतिभा आणि अभिव्यक्तीसाठी भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दीच्या निमित्ताने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व व काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दि. २८ मार्च रोजी स. १०:३० वा. विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये राज्यस्तरीय खुल्या ‘वक्तृत्व स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी १) भारतीय संविधान: जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, २) आदर्श राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ३) भारतीय शिक्षण पद्धती: काल, आज आणि उद्या, ४) विकसित भारत, ५) राष्ट्र उभारणीत माझी भूमिका हे विषय देण्यात आले आहेत. स्पर्धकांना बोलण्यासाठी ५ ते ७ मिनिटांचा वेळ दिलेला असून विजेत्या स्पर्धकास प्रथम पारितोषिक रु. २१०००, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक रु. १५०००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक रु. ११०००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ ५ पारितोषिके दिले जाणार आहेत त्यामध्ये प्रत्येकी रु. २०००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
दि. २९ मार्च रोजी स. १०:३० वा. विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात राज्यस्तरीय ‘काव्यवाचन स्पर्धा’ संपन्न होणार आहे. यामध्ये स्पर्धकाला ५ मिनिटे वेळ दिला असून स्वरचित एकच कविता सादर करता येणार आहे. संयोजकानी घालून दिलेल्या नियम व अटीनुसार या स्पर्धा होणार आहेत. काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकास १) प्रथम पारितोषिक रु. ११०००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक रु.७०००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक रु. ५०००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ ५ पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रत्येकी रु. १०००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.
सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ही स्पर्धा निशुल्क असून या राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व व काव्यवाचन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभाग नोंदवावा. असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी केले आहे. स्पर्धेमध्ये सहभाग नोंदणी करिता विद्यार्थ्यांनी दि. २७ मार्च सा. ०५:०० वा. पर्यंत वक्तृत्व स्पर्धेसाठी डॉ. राजेश्वर दुडूकनाळे (९७६६८३७३९९), डॉ. विजय भोपाळे (९८२२४३१७७१) व डॉ. संदीप काळे (९४०३०६६६३३) यांच्याशी तर काव्यवाचन स्पर्धेसाठी डॉ. अविनाश कदम (९९७५८३४७३४), डॉ. ज्ञानदेव राऊत (९४२१४८५३८६), डॉ. बालाजी भंडारे (९८२२९५९४६४) यांच्याकडे आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.