नांदेड(प्रतिनिधी)-10 फेब्रुवारीच्या गोळीबार प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 जोडल्यामुळे या प्रकरणात आज न्यायालयासमक्ष हजर केलेल्या तीन आरोपींना विशेष जिल्हा न्यायालयाने 17 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
10 फेबु्रवारी 2025 रोजी नांदेडमध्ये दोन व्यक्तींवर गोळीबार झाला. त्यात रविंद्रसिंघ दयालसिंघ राठोड (35) या युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात जखमी गुरमितसिंघ राजासिंघ सेवादार हा कैदी आहे आणि तो जखमी झाला. गुरमितसिंघला दहशतवादी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा संधूच्या भावाचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. तो 10 फेबु्रवारीच्या काही दिवसपुर्वी संचित रजेवर(पॅरोल) बाहेर आला होता. त्याची रेखी करून त्याचा खून करण्यासाठीच हा हल्ला झाला होता. पण त्याचे सुदैव आणि त्याच्या मित्राचे दुर्देव असा प्रकार घडला. गुरमितसिंघ सेवादारच्या तक्रारीवरुन अगोदर वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 2/2025 दाखल झाला. त्यामध्ये भारतीय न्याय संहितेची कलमे आणि भारतीय हत्यार कायद्याची कलमे जोडलेली होती. पुढे हा गुन्हा दहशतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे वर्ग झाला. सध्या दहशतवाद विरोधी पथकाचे राज्यातील प्रमुख आयपीएस अधिकारी चंद्रकिशोर मिणा हे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात हा तपास छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त रामेश्र्वर रेंगे यांच्याकडे देण्यात आला. या प्रकरणात आजपर्यंत 8 जणांना अटक झाली आहे. त्यातील तीन पंजाबचे राहणारे आहेत.
गोळीबार करणारा मुख्य आरोपी जगदीशसिंघ उर्फ जग्गा सुखवंतसिंघ यास पंजाब पोलीसांनी पकडले.तो आणि त्याचा सहकारी अशा दोघांविरुध्द हत्यार कायद्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणात शुभदिपसिंघ उर्फ शुभ गुरविंदरजितसिंघ हा सुध्दा पंजाबचा रहिवासी आहे. त्याला नांदेड पोलीसांनी पकडून आणले होते. पुढे या प्रकरणात अनेक जण अटक झाले. सध्या सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणात मकोका कायद्याची कलमे 3(1)(1), 3(1)(2), 3(2), 3(4) जोडून आज पलविंदरसिंघ उर्फ पिंदा अवतारसिंघ बाजवा, जगदीशसिंघ उर्फ जगा सुखवंतसिंघ आणि शुभदिपसिंघ उर्फ शुभ गुरविंदरजितसिंघ या तिघांना विशेष मकोका न्यायालयासमोर हजर केले. या प्रकरणात पुरावे जमा करण्यासाठी, बॅंक खात्यांची तपासणी करणे आहे. इतरांच्या सहभागाची विचारपूस करणे आहे. तसेच या प्रकरणात भारत सरकारने दहशतवादी घोषित केलेल्या हरविंदरसिंघ उर्फ रिंदा चरणसिंघ संधू याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न होत आहे असे सांगत पोलीस कोठडीची मागणी केली. सहाय्यक सरकारी वकील ऍड.यादव तळेगावकर यांनी या प्रकरणात पोलीस कोठडी का आवश्यक आहे याचे उत्कृष्ट सादरीकरण केले. न्यायालयाने दहशतवादी विरोधी पथक आणि सहाय्यक सरकारी वकीलांची विनंती मान्य करत या तिन जणांना 17 मार्च 2025 असे सात दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…
10 फेब्रुवारीच्या गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपीसह तिघांना पोलीस कोठडी
