नांदेड(प्रतिनिधी)-शहरात बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण करताल तर कार्यवाही होईल अशा प्रसिध्दी पत्रकाद्वारे महानगरपालिका आयुक्तांनी बातम्या तर छापून आणल्या. पण आज झालेले शहराचे विद्रुपीकरण आणि त्याची जबाबदारी कोणावर निश्चित होणार हे महानगरपालिका आयुक्तांनी सांगितले तर खुप छान होईल. नाही तर अनेक आयएएस, आयएफएस आणि आयपीएस अधिकारी सध्या मागील दहा वर्षात सरकार सांगेल तेच करत आहेत. कारण अशा अनेक अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर चांगली पदे मिळत आहेत. नुकतेच उदाहरण सेवानिवृत्त आयएफएस अधिकारी शक्तीकांत यांना पंतप्रधान कार्यालयात द्वितीय क्रमांकाचे प्रिन्सीपल सेक्रटरी बनविण्यात आले आहे. अशीच काही इच्छा नांदेड मनपा आयुक्त यांची असेल तर त्यांचे कुठे चुकले.
उद्या 28 फेबु्रवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नांदेडला येणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने नांदेड दक्षीण या विधानसभा मतदार संघातून पराभूत झालेले कॉंगे्रसचे उमेदवार मोहन हंबर्डे हे राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षात प्रवेश करणार आहेत. तो प्रवेश सोहळा ओम गार्ड कौठा येथे होणार आहे. विमानतळ ते ओम गार्ड कौठा या रस्त्याचे निरिक्षण केले तर एवढे बॅनर्स लावण्यात आले आहेत की, त्या बॅनरमुळे सर्व शहर विद्रुप दिसत आहे. शहरात असलेल्या दुभाजकांमधील लोखंडी बॅरीकेट आणि विद्युत खांब यावर सुध्दा बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे बऱ्याच वाहनधारकांचा अपघात होण्याची सुध्दा शक्यता आहे. वजिरबाद चौक ते कौठा या भागात तर अशी परिस्थिती आहे की, रस्त्याऐवजी बॅनरच पाहण्याची वेळ आली आहे.
मागे काही महिन्यांपुर्वी महानगरपालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देवून असे प्रसिध्दीपत्रक पाठविले होते की, शहराचे विद्रुपीकरण करणे हा नगर रचना अधिनियमानुसार मोठा गुन्हा आहे. यावर कार्यवाही करण्यात येईल. या शिवाय लाखो रुपये खर्च करून महानगरपालिकेने आपल्या मालकीचे बॅनर स्टॅंड शहरात असंख्य जागी बनविले आहेत. त्या बॅनर स्टॅंडवरच कायदेशीर फिस भरून बॅनर लावावेत असे प्रसिध्दी पत्रक सुध्दा पाठविले होते. त्यात अनेक पत्रकारांनी चांगली सुचना आहे म्हणून त्या बातम्या छापल्या. काही पत्रकारंाचे संबंध खुप छान आहेत महानगरपालिकेत त्या संबंधांना सांभाळून ठेवण्यासाठी त्या बातम्या छापल्या. आज शहरात बॅनर प्रदर्शन ज्या पध्दतीने झाले आहे. त्याचा कोठेच मागमुस या प्रसिध्दी पत्रकांना जोडून दिसत नाही. महानगरपालिका आयुक्त फक्त आपल्या बातम्या छापून येण्यासाठी प्रसिध्दी पत्रक काढतात काय ? असा प्रश्न आजच्या बॅनर प्रदर्शनामुळे समोर आला आहे.
अवैध, पैसे न भरलेले बॅनर प्रदर्शित करण्यासाठी महानगरपालिकेने एकदा लिंगायत समाजाच्या धार्मिक बॅनर प्रदर्शनावर कार्यवाही केली होती. धार्मिक प्रदर्शनाचे बॅनर आजच्या मानाने अत्यंत नग्ण संख्येत होते. तरी पण त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण आजच्या प्रत्येक बॅनरमध्ये उपमुख्यमंंत्री अजित पवार यांचे छायाचित्र आहे. म्हणून आजच्या बॅनर्सवर कार्यवाही करण्याची ताकत महानगरपालिका नांदेडचे आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्यात नाही असे आम्ही लिहिले तर त्यात चुक काय ? यदा कदा आम्ही काही तरी पुर्वगृह दुषीत कारणांनी ही बातमी लिहिली असेल तर उद्या आजच्या बॅनर प्रदर्शनावर कार्यवाही झाली तर आम्ही नक्कीच मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांची क्षमा याचना करू.
