‘आम्ही असू अभिजात ‘ संमेलन गीताला नांदेडचा संगीत साज ! 

 आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे गीत 

नांदेड  :- नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे गीत नांदेडच्या सुप्रसिद्ध गायिका, संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले आहे. दिग्गज गायकांचा सहभाग असणारे अभिजात मराठीला शब्दबद्ध करणाऱ्या दीर्घ काव्याला त्यांनी संगीताचा साज चढवला असून तमाम नांदेडकरांसाठी ही आनंदाची बाब आहे.

98 व्या मराठी साहित्य संमेलनासाठी नांदेड मधून एकीकडे शेकडो साहित्यिक रवाना होत आहे. आता नांदेडसाठी आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केलेले ‘आम्ही असू अभिजात ‘ हे संमेलन गीत आणखी एक आनंद वार्ता ठरले आहे.

काल राज्याचे राज्यपाल श्री.सी.पी. राधाकृष्णन, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या गीताचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी नांदेडच्या संगीतकार आनंदी विकास यांचाही सत्कार करण्यात आला. पुण्याचे गीतकार डॉ. अमोल देवळेकर यांनी लिहिलेल्या ‘आम्ही असू अभिजात ‘, या मराठी भाषेच्या गौरवगीताला संगीताचा साज चढविण्याचे काम त्यांनी केले आहे.

विशेष म्हणजे या गीताचे पार्श्वगायन सुप्रसिद्ध गायक हरिहरन, शंकर महादेवन, मंगेश बोरगावकर, प्रियंका बर्वे,सागर जाधव, शमिमा अख्तार यांनी केले आहे.या गीताचे संगीत संयोजन प्रथमेश कानडे, ध्वनिमुद्रन मन्मथ मठपती, ध्वनि मिश्रण आदित्य देशमुख यांनी केले आहे.

हे गीत संगीत, पार्श्वगायन, लेखन सादरीकरण या सर्वच कसोटीवर आगळे वेगळे सिद्ध होत आहे. या संपूर्ण गाण्याचे चित्रीकरण कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आले आहे.

त्यामुळे या गाण्याचा व्हिडिओ देखील लक्षवेधी ठरला आहे. मराठी भाषेच्या अभिजात दर्जा प्राप्त होण्याच्या घटना क्रमावर आधारित हे गीत असून कवी अमोल देवळेकर यांनी 10 अंतऱ्याचे हे दीर्घकाव्य मराठीच्या अभिजात दर्जाचा गौरव करताना लिहिले आहे. संदर्भाचे सुनियोजित सादरीकरण या गीतातून होत आहे.

दरम्यान, आयोजकांनी काल या गीताचे राज्यपालांच्या हस्ते लोकार्पण करताना संगीतकार आनंदी विकास यांना सन्मानाने या साहित्य संमेलनाला आमंत्रित केले आहे. साहित्यप्रेमी नांदेडकरांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!