शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे येथे फलाट क्रमांक -15-16 यामध्ये प्रयागराजकडे जाणाऱ्या गाडीत बसण्यासाठी झालेल्या गर्दीत चेंगरा चेंगरी झाली आणि 18 जणांचा मृत्यू झाला आणि 45 जखमी आहेत अशी घोषणा केंद्र शासानाने केली. या देशात दुर्घटना घडल्यापासून रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा की न घ्यावा यावर सुरू असलेले विचारमंथन पाहिले तर या देशात आस्था, धर्म आणि राष्ट्रवाद या सर्वांच्या जोरावर आम्हाला प्रश्न विचारू नका असे बोलले जात आहे. किंबहुना अशी परिस्थिती तयार करण्यात आली. राजनाथसिंह सारखे हुशार रक्षामंत्री सुध्दा अशा घटनांमध्ये राजीनामा नसतो असे सांगून आपले हात झटकण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही चुकच करत नाही अशी मागील दहा वर्षाची आपली परिस्थिती सांगतांना केंद्र सरकार पंडीत जवाहरलाल नेहरूने लाल बहादुर शास्त्रीसोबत अन्याय केल्याचे सांगतात. पण याच लाल बहादुर शास्त्रींनी 1954 मध्ये चार महिन्याच्या अंतरात दोन रेल्वे दुर्घटना घडल्यानंतर राजीनामा दिला होता हे जाणून बुजून विसरतात अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची दिसते. लाल बहादुर शास्त्री हा जुना विषय आहे. पण 2013 मध्ये झालेल्या प्रयागराज येथील कुंभमेळ्यात सुध्दा प्रयागराज रेल्वे स्टेशनवर घडलेल्या दुर्घटनेची जबाबदारी स्विकारून तत्कालीन उत्तर प्रदेशचे मंत्री आणि कुंभ मेळ्याचे प्रभारी आजम खान यांनी अत्यंत जड मनाने संवेदना व्यक्त करून माझ्या काही संबंध नसतांनाही ती माझी जबाबदारी आहे असे सांगून राजीनामा दिला होता. या गोष्टींचा विसर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना झाला असेल पण जनता याला विसरलेली नाही.
दि.15 फेबु्रवारी रोजी नवी दिल्ली स्टेशनवरून भुमेश्र्वर राजधानी एक्सप्रेस, स्वातंत्रता सैनानी एक्सप्रेस आणि प्रयागराजसाठी विशेष रेल्वे जाणार होती. रेल्वे विभागाने दिलेल्या माहिती नुसार दर तासाला 1500 तिकिट विकली जात होती. एका रेल्वे टब्यात 72 प्रवाशी प्रवास करू शकतात आणि त्या प्रयागराज रेल्वेमध्ये किती सर्वसाधारण बोग्या होत्या. याचा काही थांगपत्ता मात्र नाही. पण चेंगरा चेंगरी झाल्यानंतर दिल्लीचे उपराज्यपाल मरणाऱ्या व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण करतात आणि काही तासाने ती श्रध्दांजली वगळतात. याला काय म्हणावे. पुढे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मरणाऱ्या व्यक्तींबद्दल आपल्या ट्विटरवर वक्तव्य जाहीर करतात त्यानंतर रेल्वे विभाग 18 मृत्यू मान्य करतो आणि काही जखमी झाले आहेत हे ही मान्य करते. ही घटना कुंभ मेळ्यात झालेल्या दुर्घटनेनंतर अशीच घडली होती. त्याही वेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मृत्यू मान्य केल्यानंतर 30 मृत्यू जाहीर करण्यात आले होते. अशाच पध्दतीने नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर घडलेल्या घटनेत बिहारी-9, दिल्ली-8 आणि हरियाना-1 असे मृत्यू झालेल्यांची संख्या आहे. याच भागातील लोक जखमी पण आहेत. दर तासाला 1500 तिकिट विकले जात होते. तेंव्हा रेल्वे विभागाने त्याची सोय करायला हवी होती. अचानकच गाडीचा फलाट बदलला हे सांगितल्यानंतर धावपळ होणारच पण त्याचे नियोजन करण्याची जबाबदारी सुध्दा रेल्वे विभागावरच आहे. रेल्वे नियमांप्रमाणे सर्वधारण दिवसांपेक्षा काही विशेष महत्वाचा सन असेल त्यावेळेस रेल्वेतील पोलीस आणि रेल्वे विभागाचे अधिकारी 22 या संख्येत प्रत्येक फलाटावर असणे आवश्यक आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर दुपारी 4 वाजल्यापासूनच गर्दी होती हे रेल्वे विभागाच्या लक्षात आले मग त्यांनी ती संख्या 44 का केली नाही. चेंगरा-चेंगरी तर रात्री 9.50 वाजता घडली. मग या घटनेला नियोजन शुन्यता म्हटले नाही तर आम्हालाच लाज वाटेल.
रविवारची पहाट होताच या चेंगरा-चेंगरीची चर्चा सुरू झाली. भारतीय जनता पार्टीच्यावतीने रक्षामंत्री राजनाथसिंह आणि रविशंकर प्रसाद यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेवून बोलत असतांना पत्रकारांनी विचारलेल्या रेल्वे मंत्री अश्र्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्यावर राजनाथसिंह बोलले आणि असे बोलले की, ऐकतांना सुध्दा लाज वाटू लागली. राजनाथसिंह प्रमाणे अशा घटनांमध्ये राजीनामे होत नसतात. याला जोडूनच रविशंकर प्रसाद म्हणाले आमचे मंत्री राजीनामे देत नसतात आणि आमचे मंत्री त्या मंत्र्यांसारखे करत नसतात. खरे तर याही शब्दांवर लाज वाटायला हवी होती. राजीनामा घेणे, द्यायला लावणे हा प्रकार मागील 10वर्षात बंदच झालेला आहे. 10 वर्षानंतर 2 वर्षापासून जळणाऱ्या मणीपुरमध्ये मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचा राजीनाम घेतला खरा तो या भितीने होता की, अमेरिकेत कोणी मानवी हक्क आयोगाचे प्रश्न उपस्थित करेल. आणि तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली. मंत्र्यांचे राजीनामे होत नसतात. असे म्हणणारे राजनाथसिंह मागे 700 शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर म्हणाले होते की, ते काय माझ्यासाठी मेले आहेत. पुलवामा हल्याला जवळपास 7 वर्ष होत आली आहेत. पण ते मेले की मारले की मरु दिले या प्रश्नाची उत्तरे अद्याप भेटलेली नाही. त्या दुर्देवी 42 सैनिकांना आजपर्यंत शहिद हा दर्जा सुध्दा देण्यात आलेला नाही. या पुलवामा हल्याला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोठा मुद्या करण्यात आला होता आणि त्यावरच विजय मिळवला होता. चिनच्या सिमेत अतिक्रमण झत्तले ही बाब केंद्र सरकारने आपल्या सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतरच मान्य केली होती अशा या अजब विचारांच्या नेत्यांच्या हातात भारताचे राज्य चालविण्याची जबाबदारी आहे.
स्वत: राजीनामा द्यायचा नाही आणि पंतप्रधान जवारलाल नेहरु यांनी लाल बहादुर शास्त्रींवर अन्याय केला म्हणायचे हे सांगतांना थोडी लाज पण वाटली नाही. 1954 मध्ये रेल्वे अपघात होताच शास्त्रीजींनी राजीनामा दिला पण पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि इतर मंत्र्यांनी त्यांना समजून सांगितले की, राजीनाम्यांची गरज नाही तेंव्हा ते थांबले पण दुर्देवाने चार महिन्यात दुसरा रेल्वे अपघात घडला आणि तेंव्हा त्यांनी राजीनामा दिला होताच. लालबहादुर शास्त्री यांचे उदाहरण जुने असेल. ज्या आजम खानला केंद्र सरकारने विविध आरोपातून तुरूंगवास घडविला. त्यांच्या राजीनाम्याची कथा सुध्दा इतरांना मान खाली घालवणारी आहे. सन 2013 च्या कुंभ मेळ्याचे आजम खान प्रमुख होते. त्यावेळेस प्रयागराज रेल्वे स्टेशनवर चेंगरा-चेंगरी झाली आणि काही भाविकांचा मृत्यू झाला होता. खरे तर ती जबाबदारी आजम खानचीही नाही आणि उत्तर प्रदेश शासनाची सुध्दा नव्हती. पण धर्माशी जोडलेले मृत्यू सर्वसामान्य मृत्यूपेक्षा जास्त दु:ख देतात. म्हणून मी माझी जबाबदारी नसतांना सुध्दा दु:खातून राजीनामा देत आहे. केंद्राचे सरकार, केंद्राचे मंत्री राजीनामा हा प्रकारच विसरले आहेत.

रेल्वे मंत्री अश्र्विनी वैष्णव जर अद्याप गंगास्नानाला गेले नसतील तर त्यांनी नक्कीच या पुढे सुध्दा जाऊ नये असे आम्हाला वाटते. कारण अश्र्विनी वैष्णव यांनी दाखवलेली अनास्था आणि राजनाथसिंह यांचे थट्टा उडविणारे शब्द या पापांना धुता-धुता आई गंगेला सुध्दा लाज वाटेल. केंद्र सरकारने चेंगरा चेंगरीत मरणाऱ्यांना आणि जखमींना मोबदला जाहीर केला आहे. आम्ही असे आवाहन सरकारला करतो की, मोबदला देवू नका पण त्यांना शिव्या सुध्दा देवू नका कारण ते मरण पावले आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगरा-चेंगरीत मरण पावलेल्या व्यक्तींबद्दल वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा संवेदना व्यक्त करते.