नांदेड(प्रतिनिधी)-गुरुद्वारा गेट क्रमांक 6, शहिदपुरा येथे झालेल्या गोळीबार, खून, जिवघेणा हल्ला या प्रकरणात हल्लेखोराची ओळख पटली आहे. पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार हा गुन्हा आता तपासासाठी दहशतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
दि.10 फेबु्रवारी रोजी सकाळी 9.30 वाजताा शहिदपुरा येथे पॅरोल रजेवर आलेला कैदी गुरमितसिंघ राजासिंघ सेवादार (35) आणि रविंद्रसिंघ दयालसिंघ राठोड (30) या दोघांवर गोळीबार झाला. ते दोघे स्कुटीवरून जात होते. गुरूमितसिंघ सेवादारचे घर शहिदपुऱ्यात आहे. नळ्या रंगाचे जॅकेट परिधान केलेल्या हल्लेखोराने गोळीबार करून तो दुचाकीवरून पळून गेला. जखमी अवस्थेतील राठोडने आपले दुचाकी पळवत रुग्णालय गाठले. उपचारादरम्यान रविंद्रसिंघ राठोडचा मृत्यू झाला. या संदर्भाने वजिराबाद पोलीस ठाण्यात गुरमितसिंघ सेवादारच्या जबाबावरून गुन्हा क्रमांक 62/2025 दाखल करण्यात आला होता.
वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय अनेक पोलीस अधिकारी आणि अनेक पोलीस अंमलदार या तपासात परिश्रम घेत होते. त्यांना अखेर यश आले. 13 फेबु्रवारी रोजी मनप्रिसिंघ उर्फ मन्नू गुरूबक्षसिंघ ढिल्लो (31), हरप्रितीसिंघ उर्फ हॅप्पी बाबुसिंघ कारपेंटर या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने 20 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या तपासात एनआयएने हल्लेखोराची ओळख पटवल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी सांगितली आहे. हल्लेखोराला वाहन पुरविणे, मोबाईल पुरविणे, सिम कार्ड पुरविणे, त्याला गुरमितसिंघच्या घराची रेखी करण्यासाठी मदत करणे यासाठी मदत करणाऱ्यांची यादी तयार झाली होती. पोलीस महासंचालकांच्या आदेशान्वये हा गुन्हा आता पुढील तपासासाठी दहशतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पाोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड पोलीसांचे या उत्कृष्ट कार्यवाहीसाठी कौतुक केले आहे.
संबंधीत बातमी….