नांदेड(प्रतिनिधी)-एका अपंग युवतीची तिच्या घरात घुसून बेअबु्र करणाऱ्या एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी साडे तीन वर्ष सक्तमजुरी आणि 15 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
पोलीस ठाणे माहुरच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार 3 फेबु्रवारी 2021 रोजी त्यांच्या बहिणीच्या युवतीला जी जन्मापासूनच अपंग, बुकबधीर, व मतीमंद आहे अशा युवतीला कृष्णा मारोती शिंदे (32) या व्यक्तीने व्हिडीओ दाखवतो म्हणून तिला मोबाईल दिला आणि ती घरात एकटी असतांना बाजेवर कृष्णा बिन कपड्याचा त्या व्यक्तीला दिसला. युवतीपासून त्याला दुर करण्यात आले आणि पकडून ठेवले. या संदर्भाने कोणी तरी माहुर पोलीसांना माहिती दिली आणि माहुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. युवतीच्या मामाच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 108/2021 माहूर पोलीस ठाण्यात दाखल झाला. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 376, 376(2)(जे), 376(2)(एल) आणि 452 प्रमाणे कृष्णा मारोती शिंदेवर आरोपी ठेवण्यात आले. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक ए.आर.पवार यांनी या प्रकरणात सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात या प्रकरणी सत्र खटला क्रमांक 276/2021 प्रमाणे या प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीत 10 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. न्यायालयाने उपलब्ध असलेला लेखी आणि तोंडी पुरावा तसेच जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ऐकल्यानंतर आरोपी कृष्णा शिंदेला भारतीय दंड संहितेच्या 354, 354(ब) आणि 452 प्रमाणे सोबत अपंग कायदा जोडून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी या प्रकरणातील गुन्हेगार कृष्णा शिंदेला साडे तीन वर्ष सक्तमजुरी आणि 15 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात पोलीस ठाणे माहुर येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रसाद मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार किशोर मेडपलवार पैरवी अधिकाऱ्याची भुमिका पुर्ण केली.

