नांदेड(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री नांदेड जिल्ह्यात आभार यात्रेसाठी आले असतांना अनेक ठिकाणी हजर राहून डीसीएम सुरक्षा भेदून निलंबित पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांनी शिष्टाचाराचा सुध्दा फज्जा उडविला आहे. कोण प्रयत्न करत आहे. अशोक घोरबांडला डीसीएम यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी हा महत्वाचा प्रश्न आहे. अनेक सामाजिक संकेत स्थळावर याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
दि.10 जानेवारी रोजी परभणी येथे मरण पावलेला भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीमुळे झालेचा अहवाल वैद्यकीय सुत्रांनी दिला होता. त्यानंतर शासनाने सभागृहात सोमनाथ सुर्यवंशीच्या मारहाण आरोपातून परभणीच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित केले होते आणि त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. तसेच त्यानंतर त्यांच्या चौकशीसाठी न्यायालयीन समितीची स्थापना सुध्दा करण्यात आली आहे. ही चौकशी अद्याप पुर्ण झालेली नाही.
काल दि.6 फेबु्रवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यावर आले असतांना अनेक ठिकाणी अशोक घोरबांड त्यांच्या कार्यक्रमात दिसत होते. यासंदर्भाचे काही फोटो आणि व्हिडीओ लोकांनी घेतले आणि त्यांना आपल्या सामाजिक संकेतस्थळावर जाहीर करून नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी प्रश्न असाही आहे की, उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेला अशोक घोरबांडने भेदले कसे. तसेच शिष्टाचाराचा फज्जा उडवून अशोक घोरबांड असे वागत होते की, ते स्वत: सुरक्षेच्या बंदोबस्तात आहेत. असे घडू शकते का पण याबद्दलची माहिती घेतली असता कोणी तरी त्यांना पाठबळ देत असेल आणि म्हणूनच त्यांची एवढी हिम्मत झाली की, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या आसपास फिरतात. उपमुख्यमंत्री गाडीत बसत असतांना त्यांच्या गाडीजवळ उभे राहतात. पण उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील विशेष सुरक्षा विभागाचे पोलीस त्यांना बाजूला करतात असे चित्र त्या व्हिडीओमध्ये आहे.