बातम्या लिहितांना असे अनेकदा लिहिले आहे की, पोलीस खाते करील ते होईल ही म्हण महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर प्रदेशमध्ये सुध्दा सत्यच आहे. कुंभमेळ्यात झालेल्या चेंगरा-चेंगरीत मरण पावलेल्या लोकांकडून मेलेल्या व्यक्तीचा मृत्यू हा चेंगरा-चेंगरीत झाला नसून साधा झाला आहे, सामान्य मृत्यू आहे असे लिहुन घेण्याची प्रथा सुरु झाली आहे. अशी एक चिठ्ठी व्हायरल झाली आणि त्यानंतर आपल्यावर येणारे क्लेम लपविण्यासाठी किंवा त्यापासून वाचण्यासाठी हा धंदा सुरू झाला आहे. पुढे हा प्रकार कधी तरी योगी आदित्यनाथ यांना महागात पडणार आहे.
मौनी आमवस्येच्या दिवशी कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमसह इतर दोन ठिकाणी चेंगरा-चेंगरी झाली आणि त्यात मरण पावलेल्या माणसांचा आकडा लपवला गेला. केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टी यांच्या पायीखालची माती आपल्या डोक्याला लावणाऱ्या मिडीयाने तेथे काही घडलेच नाही असेच सांगितले. अफवांवर विश्र्वास ठेवू नका असा प्रचार केला. मरणाऱ्यांचा आकडा काही ही असेल पण तो सार्वजनिक करणे आवश्यक होते आणि तसेच घडलेले नाही. आजही तेथे हरवल्याचा शोध असे अनेक बोर्ड लावलेले दिसतात. पण तो हरवलेला काही सापडत नाही. वेगवेगळ्या माध्यमातून काही प्रसार माध्यमांनी मिळवलेल्या माहितीनुसार मृत्यू हे 100 पेक्षा जास्त आहेत आणि 1500 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. 2 महिलांना तर एका युवकाने 500 रुपयांमध्ये या ठिकाणी सोडतो असे म्हणून सोबत नेले. त्या महिला सुध्दा गायब आहेत.
मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे जाणाऱ्या मानसिंग बघेल रामहेत बघेल यांनी कुंभ मेळ्याच्या ठाणेदाराला लिहिलेल्या चिठ्ठीनुसार 27 जानेवारी 2025 रोजी त्यांच्या आत्याचा मुलगा कामताप्रसाद मलखामसिंग बघेल (50) हा अनेक लोकांसोबत त्रिवेणी संगम स्नानासाठी कुंभमेळ्यात गेला आणि तो महानिर्वाणी आखाड्यात थांबला होता. तेथे अचानक त्याची तब्बेत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. मी आपणास सुचना देत आहे की, आवश्यक ती कार्यवाही करावी. ही चिठ्ठी सार्वजनिक झाल्यानंतर या बद्दल अत्यंत भित्रेपणा, मानवताहिन आणि नैतिकताहिन हे कृत्य असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मृत्यूऐवजी मोक्ष प्राप्तीची नोंद कुंभमेळा ठाणेदार घेत आहे. कारण धिरेन शास्त्री म्हणाले होते की, येथे झालेले मृत्यू म्हणजे मोक्ष प्राप्ती आहे. यावर उत्तर देतांना शंकराचार्य अविधेशानंदजी सरस्वती यांनी सांगितले होते की, धिरेनशास्त्रीला मोक्ष हवा असेल तर मी धक्का मारायला तयार आहे. त्यांनी सर्वसामान्य माणसाची बाजू या कुंभमेळ्यात मांडल्यामुळे त्यांना शिव्याश्राप दिले जात आहेत. परंतू मी काय चुकीचे बोललो असे शंकराचार्य विचारत आहेत.
मरण पावलेल्या कांताप्रसादबद्दल लिहिलेली चिठ्ठी म्हणजे आता त्याचे शवविच्छेदन करण्याची गरज नाही. तसेच नुकसान भरपाई मागण्याचा प्रश्न नाही कारण मृत्यूच चेंगरा-चेंगरीत झालेला नाही. असा हा धंदा त्या ठिकाणी पोलीसांनी सुरू केला आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्रात म्हणतो ती पोलीस खाते करील ते होईल ही म्हण उत्तर प्रदेशमध्ये सुध्दा सार्थ होत आहे.
1 फेबु्रवारी रोजी देशाच्या राज्यसभेचे अध्यक्ष तथा उपराष्ट्रपती धनकड तेथे आले. पुन्हा व्हीव्हीआयपी पध्दतीनेच त्यांनी स्नान केले. आपल्या स्नानाचे चित्रीकरण करण्यासाठी अनेक फोटोग्राफर आणले ते सुध्दा धावपळ करतांना दिसत होते. 4 फेबु्रवारीपर्यंत व्हीव्हीआयपी पास बंद केले होते. मग धनकड साहेब कसे आले आणि जर ते आले आहेत तर व्हीव्हीआयपी पध्दतीमुळेच चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली हे सत्यच म्हणावे लागेल. अखिलेश यादव अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलू लागले तेंव्हा लोकसभेचे सभापती ओम बिल्डा नाराज झाले. पण विरोधकांनी कुंभमेळ्याची चर्चा व्हावी ही बाब लावूनच धरली. परंतू त्यांना परवानगी मिळाली नाही आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थ संकल्पीय भाषण सुरू करताच विरोधकांनी सभा त्याग केला. लालु प्रसाद यादव म्हणतात. कुंभमेळ्यामध्ये जाणाऱ्या लोकांमधील सर्वाधिक संख्या बिहार राज्यातील नागरीकांची आहे आणि त्यांचेच मृत्यू जास्तप्रमाणात झाले आहेत. उत्तर प्रदेश सरकार आकडा लपवत आहे. याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार काही बोलत नाहीत. कारण त्यांना भारतीय जनता पार्टी सोबत राज्य चालवायचे आहे आणि पुढील निवडणुक लढवायची आहे. निवडणुकीच्यावेळेस मात्र हा मुद्या त्यांना भारी पडेल. यु.पी.चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पांघरलेली नकारात्मकत्ता भारताच्या लोकशाहीची अवस्था सांगते. मागे सुध्दा कोरोना काळात शेकडो प्रेत या त्रिवेणी संगमातून वाहत असतांना सुध्दा योगी आदित्यनाथ यांनी त्याला सुध्दा नकार दिला होता. एखाद्या घटनेला आम्ही जेवढ्यांदा नाकारतो. तेवढयाच जोरदारपणे ती घटना पुन्हा आपल्या समक्ष येत असते. याचे उदाहरण पाहायचे असेल तर एखादा चेंडू हातात घेवून भिंतीवर मारून पाहा. वाचकांना त्याचा प्रत्यय येईल. संत कधी खोटे बोलतो का आणि जर संत खोटे बोलत असेल तर त्याचे संत पण समाप्त होत असते. बहुदा योगीजींना याचा विसर पडला असेल. संतामध्ये मातृत्व भाव असतो. कारण त्याला सगळीकडे एकाच दृष्टीने पाहायचे असते. यासाठी एका संतासमोरून एक हरण पळत गेला आणि त्याच्या मागे शिकारी आले आणि त्यांना विचारले हरण कोणीकडे पळाला. तेंव्हा संतांनी उत्तर दिले होते. ज्यांनी हरणाला पाहिले ते बोलू शकत नाहीत आणि जे बोलू शकतात त्यांना हरण दिसला नाही. आज कोठे गेला हा भाव हा प्रश्न तयार झाला आहे.
उद्या कधी भारताचा ईतिहास लिहिला जाईल, कुंभमेळ्याचा ईतिहास लिहिला जाईल. त्यावेळी या खोट्या चिठ्ठयाचा उल्लेख सुध्दा होईल. कारण चिठ्ठ्या सार्वजनिक झाल्या आहेत. खोट्या चिठ्ठ्या लिहुन घेणाऱ्यांपेक्षा तो मुस्लीम समाज श्रेष्ठ ठरला ज्याच्या नावाने तुम्ही बटोगे तो कटोगे घोषणा दिली, सनातनला धोका आहे असे सांगितले. मस्जिदीखाली शिवलिंग शोधत आहात तरीपण चेंगरा-चेंगरीनंतर प्रयागराजमध्ये राहणाऱ्या मुस्लिमांनी आपली घरे, आपल्या दर्गा, मस्जिदी पुर्णपणे मोकळ्या केल्या आणि त्रासलेल्या कुंभमेळा भाविकांना तेथे आसरा दिला, त्यांच्या जेवणांची सोय केली, त्यांचा औषधींसाठी धावपळ केली. त्यांच्या घरात आज कुंभमेळ्यातील भाविक आहेत म्हणून त्यांनी आपल्या घरात मास सुध्दा शिजवले नाही. हे आहे मानवतेचे दर्शन. धर्मापेक्षा मानवता मोठी आहे हे यातून दिसते.
चेंगरा चेंगरीत मरण पावणाऱ्यांचा मृत्यू सामन्य मृत्यू अशी चिठ्ठी लिहुन घेतली जात आहे
