नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथे राहणारे सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक यांनी 21 वर्षामध्ये आपल्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 16.65 टक्के अपसंपदा जमवली आहे. हा आकडा 28 लाख 74 हजार 146 रुपये आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक संजय पुजलवार यांच्यासंदर्भाने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई या कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान संजय पुजलवार आणि त्यांच्या पत्नी मनिषा पुजलवार रा.आमदारनगर, मालेगाव रोड नांदेड यांच्याकडे 1 मे 1998 ते 31 मार्च 2019 या 21 वर्षाच्या कालखंडात त्यांच्याकडे अपेक्षीत कायदेशरी उत्पन्नाच्या स्त्रोतांप्रमाणे जेवढी संपत्ती असावी त्यापेक्षा 28 लाख 74 हजार 146 रुपयांची जास्त मालमत्ता सापडली. ही टक्केवारीच्या तुलनेत ही अपसंपदा 16.65 टक्के आहे आणि ती अपसंपदा आहे.
यानुसार मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक संतोश कमलाकर गुर्जर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड येथे अपसंपदेसाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 13(1)(ब), 13(2) आणि 12 नुसार पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गुन्हा क्रमांक 59/2025 दाखल करण्यात आला आहे.
नांदेड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.संजय तुंगार, पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक माधुरी यावलीकर अधिक तपास करीत आहेत.
या माहितीसह लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/ कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी माणुस(एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी कायदेशीर फिस व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांचा मोबाईल क्रमंाक 9870145915 , कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02462-253512 आणि टोल फ्रि क्रमंाक 1064.