नांदेड(प्रतिनिधी)-शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी नांदेड उत्तरमधील उमेदवारी करोडो रुपयांना विकली असा आरोप शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या युवासेनेचे माजी जिल्हा समन्वयक योगेश पाटील नंदनवनकर यांनी केला आहे.
उध्दव ठाकरे गटाचे लोहा विधानसभा मतदार संघातील उमेदवार एकनाथ पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर उध्दव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपानंतर योगेश पाटील यांनी आज पत्रकार परिषद बोलवली आणि त्यात ते बोलत होते. त्यांच्या सांगण्याप्रमाणे शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी निवडणुकीच्या काळात दलालीच केली आहे. अर्थात उमेदवारी देण्यासाठी पैसे, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा घेण्यासाठी पैसे, त्यांच्या पुणे येथील घराचा टॅक्स भरण्यासाठी पैसे, पदाधिकारी निवडीसाठी पैसे घेतले. त्यावेळी आम्हाला विधानसभा लढवायची होती, उमेदवारी पाहिजे होती, आमचे हात दगडाखाली होते, आम्हाला गरज होती म्हणून आम्ही हे सर्व सहन केले. निवडणुकीनंतर पक्ष प्रमुखांना सांगू असा आमचा विचार होता. आम्ही काही बोललो तर तुम्हाला उमेदवारी मिळू देणार नाही, तुमची पक्षातून हाकलपट्टी करू अशा धमक्या बबन थोरात देत होते. सुभाष वानखेडेसारखी तुमचीही हाकलपट्टी करेल अशा धमक्या आम्हाला देत होते. एकनाथ पवार यांच्या कार्यकर्त्यावर हल्ला करून त्याची बोटे छाटण्यात आली. त्यांना सुध्दा व्यासपीठावरून खाली पाठविले होते. आज आम्ही पत्रकार परिषदेत बोलत असलेल्या सर्व घटना संजय राऊत यांना भेटून सांगितल्या आहेत आणि आमच्या पदाचा राजीनामा पण दिलेला आहे असे योगेश पाटील म्हणाले. पक्ष प्रमुख सन्माननिय उध्दव ठाकरे यांच्या बद्दल आम्हाला काही तक्रार नाही. संपर्क प्रमुखामुळे नांदेड जिल्ह्यातील शिवसेना सोडून कार्यकर्ते दुसरीकडे जात आहेत असा आरोप योगेश पाटील यांनी केला. बेस्टमध्ये कर्मचारी असणारे बबन थोरात यांनी कोट्यावधी रुपयांची घरे कशी घेतली असा प्रश्न योगेश पाटील यांनी उपस्थित केला. बबन थोरात यांच्या संपत्तीची चौकशी ईडी मार्फत व्हायला हवी असे सुध्दा योगेश पाटील म्हणाले. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी सुध्दा शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी आरोप केलेले आहेत. हे जेथे जातात तेथे शिवसेना संपविण्याचा प्रयत्न करतात असा आरोप सुध्दा योगेश पाटील यांनी केला. बबन थोरात यांच्या फोनची संपूर्ण सविस्तर चौकशी झाली तर सर्वच सत्य बाहेर येईल. शिवसेना हा पक्ष वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवूनच काम केले आहे. पण अशा बबन थोरात सारख्या व्यक्तीमुळेच शिवसेनेचा सत्यनाश होत असल्याचे योगेश पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत योगेश पाटील नंदनवनकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील झोन क्रमांक 6 मधील मालमत्ता क्रमांक 1060501475.00 चे कर भरलेल्या पावत्या पत्रकारांना दिल्या. या पावत्यांवर मालकाचे नाव संगिता बबनराव थोरात असे आहे. आणि भोगवटदाराचे नाव सुध्दा संगिता बबनराव थोरात असे आहे. व्हाटसऍपवर या पावत्या पाठवल्यानंतर बबन थोरात यांनी पण प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्या स्क्रीन शॉर्टचे झेरॉक्स सुध्दा दिल्या आहेत. तसेच दुसऱ्या घराचेही असेच सविस्तर कागदपत्र योगेश पाटील यांनी पत्रकारांना दिले आहेत.