नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी एकाच दिवसात दोन ठिकाणी गुटखा पकडून अत्यंत उत्कृष्ट कार्यवाही केली आहे. या दोन प्रकरणात मिळून अर्धापूर पोलीसांनी गुटखा आणि गुटखा वाहतुक करणारे वाहन अशा एकूण 5 लाख 90 हजार 351 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नांदेड पोलीसांनी दिलेल्या प्रेसनोटच्या माहितीनुसार दि.24 जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर 3 आणि 4 वाजता अर्धापूर पोलीस पथकाने दोन ठिकाणी शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा पकडला. त्यात गुन्हा क्रमांक 43 आणि 44 दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांमध्ये आरोपी या सदरात नवनाथ दिगंबर गादेवार आणि साईनाथ बने तसेच दुसऱ्या गुन्ह्यात फक्त चार चाकी वाहनचा फरार झालेला चालक असे नमुद आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलीसांनी नवनाथ दिगंबर गादेवार यांच्या घरी छापा टाकून 3 लाख 67 हजार 926 रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा जप्त केला. त्याने हा गुटखा साईनाथ बने (41) रा.बारड याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. या दोघांनाही आरोपी करण्यात आले आहे. तसेच बारड येथील गुंफा गल्लीतील सार्वजनिक रस्त्यावर पोलीस पथकाने एम.एच.20 बी.सी.1197 या गाडीसह पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील चालक गाडी सोडून पळून गेला. त्यामध्ये 72 हजार 425 रुपयांचा गुटखा आणि 1 लाख 50 हजारांचे चार चाकी वाहन असा मुद्देमाल जप्त केला. या दोन कार्यवाहीमध्ये अर्धापूर पोलीसांनी एकूण 5 लाख 90 हजार 351 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी करणारे अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम, सहाय्यक पोलीस निरिक्षक विष्णु कऱ्हाळे, पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे, पोलीस अंमलदार विजय आडे, शिवराज गोणारकर, बाबूराव घाटे, रुपेशकुमार नरवाडे, महेंद्र डांगे, अखील बेग यांचे कौतुक पोलीस उपअधिक्षक डॅनियल बेन यांनी केले आहे.