नांदेड(प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे घडलेले हत्याकांड आणि परभणी येथील हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करण्यासाठी शासनाने न्यायालयीन चौकशी समिती गठीत केली आहे. परभणीसाठी सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही.एल.आचलिया आणि मस्साजोगच्या चौकशीसाठी सेवानिवृत्त न्यायाधीश एम.एल.ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मस्साजोग ता.केज जि.बीड येथील सरपंच संतोश पंडीतराव देशमुख यांच्या हत्तेप्रकरणी सेवानिवृत्त न्यायाधीश एम.एल.ताहलियानी यांच्या अध्यक्षतेत एक सदस्यीय चौकशी समिती काम करेल. मस्साजोग ता.केज जि.बीड येथील सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्येप्रकरणी घडलेल्या घटनांचा क्रम त्याची कारणे आणि त्याचा परिणाम याचा अभ्यास केला जाईल. या घटनेसाठी कोणतेही व्यक्ती किंवा संस्था प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार होती का? याची तपासणी होईल. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेनेे केलेले नियोजन आणि तयारीची पर्याप्तता पुरेशी होती किंवा कसे याचा अभ्यास होईल. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीसांनी उचललेली पाऊले योग्य होती का? याची तपासणी समिती करेल. या संदर्भाने सर्वांची जबाबदारी निश्चित करेल. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीसांनी करावयाच्या अल्पकालीन आणि दिर्घकालीन कायम स्वरुपी उपाय योजना समिती सुचवेल. या प्रसंगाशी अनुरूप कोणतीही महत्वाची सुचना समितीला करता येईल.
न्यायालयीन चौकशी समितीला काही अधिकार देण्यात आले आहेत. या घटनेशी संबंधीत माहिती मिळविण्यासाठी चौकशी समिती कोणत्याही व्यक्तीला बोलावू शकते. कोणत्याही इमारतीत किंवा जागेत प्रवेश करण्याचा अधिकार किंवा त्यासाठी कोणालाही प्राधिकृत करण्याचा अधिकार आणि कोणतेही संशयीत दस्तऐवज, खाते किंवा कागदपत्रे जप्त करण्याचा अधिकार समितीला असेल. समितीसमोरची सर्व कार्यवाही न्यायालयीन स्वरुपाची असेल. या चौकशी समितीचे मुख्यालय बीड येथे राहिल. आपला चौकशी अहवाल स्वयंस्पष्टपणे अभिप्रायासह शासनात समिती स्थापनेच्या निर्णयापासून 3 ते 6 महिन्यात सादर करायचा आहे. हा शासन निर्णय गृहविभागाचे उपसचिव हेमंत महाजन यांच्या डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित झाला आहे.
जवळपास याच आधारावर याच अटीवर याच अधिकारांच्या अनुशंगाने परभणी येथील हिंसाचार तसेच सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही.एल.आचलिया यांच्या अध्यक्षतेत एक सदस्यी समिती स्थापित करण्यात आली आहे. या समितीचे कार्यालय परभणी येथे राहिल.