नांदेड(प्रतिनिधी)- विष्णुनगर भागात एक घरफोडून चोरट्यांनी 34 हजार रुपयांचा ऐवज लांबवली आहे. कंधार तालुक्यातील मौजे फुलवळ येथे एका घरातून चोरट्यांनी 48 हजार 45 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. एसव्हीएम कॉलनी किनवट येथे एक घरफोडून चोरट्यांनी 41 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच सर्वात मोठी घटना उमरी ते चिंचाळा जाणाऱ्या रस्त्यावर अख्ये 6 लाख 50 हजार रुपयांचे जेसीबी चोरीला गेले आहे.
बारुळ येथील ओमकार गंगाधर अमृतवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 डिसेंबरच्या रात्री 10.30 ते 28 डिसेंबरच्या सकाळी 9.30 वाजेदरम्यान त्यांनी उमरी ते चिंचाळा जाणाऱ्या रस्त्यावरील चिंचाळा फाटा येथे, नागठाणा जवळीच चढावर आपले जेसीबी क्रमांक एम.एच.20 ए.एस.3423 उभे केले होते. ते कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. या जेसीबीची किंमत 6 लाख 50 हजार रुपये आहे. उमरी पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 435/2024 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार कोलबुध्दे अधिक तपास करीत आहेत.
विष्णुनगर नांदेड येथे राहणारे राजेंद्रप्रसाद सत्यनारायण समुदर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 डिसेंबरच्या मध्यरात्री 12.30 ते पहाटे 5 वाजेदरम्यान त्यांच्या घराचे लॉक तोडून चोरट्यांनी कपाटातील चांदीचे शिक्के, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 34 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 506/2024 नुसार दाखल केली आहे. पोलीस अंमलदार मंगनाळे अधिक तपास करीत आहेत.
मौजे फुलवळ ता.कंधार येथील सुधाकर किशन गढवे या ऍटो चालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 डिसेंबर रोजी ते आपल्या कुटूंबासह झोपल्यानंतर 28 डिसेंबरला पहाटे 5 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम 48 हजार 45 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कंधार पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 548/2024 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस अंमलदार काळे अधिक तपास करीत आहेत.
किनवट येथील एसव्हीएम कॉलनीमधील रहिवासी रामदास विठ्ठल गुट्टे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 डिसेंबरच्या दुपारी 2 ते 28 डिसेंबरच्या सायंकाळी 5 वाजेदरम्यान त्यांचे बंद घरफोडून चोरट्यांनी चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 41 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. किनवट पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 371/2024 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस अंमलदार वाडगुरे अधिक तपास करीत आहेत.