वाहनासाठी रिफ्लेक्टर वापरा ;अपघात टाळा; जिल्हाधिकाऱ्यांचा चालकांशी संवाद 

*प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षा सप्ताह* 

नांदेड :-रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत आज नांदेडच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जिल्ह्यातील साखर कारखान्यातील वाहनचालकांसोबत रस्ता सुरक्षा संदर्भातील संवाद साधण्यात आला. स्वतः जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी वाहन चालकांना भेटून त्यांना रस्ता सुरक्षा विषयक सूचना केल्या.

नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर कारखान्यामध्ये सध्या ऊसतोड व ऊस पोहचवण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे हजारो ट्रॅक्टर ट्रॉल्या गावागावातून प्रवास करतात.या ट्रॅक्टर ट्रॉल्यांना कोणताही अपघात होऊ नये, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्याकडून रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे व त्यांच्या अन्य सहकार्यांनी यासंदर्भात आज सर्व साखर कारखान्याच्या वाहन चालकांची वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूकदारांशी संपर्क साधला.

स्वतः जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उपप्रदेशक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांच्यासोबत लोहा येथील साखर कारखान्यामध्ये वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी ऊस वाहतूक करताना रिफ्लेक्टर कापड व रिप्लेक्टिव्ह रेडियम टेप ट्रॅक्टर वर लावण्यात यावा असे आवाहन केले.

रात्रीच्या अंधारामध्ये अनेक वेळा ट्रॅक्टरचे इलेक्ट्रॉनिक रिफ्लेक्टर, लाईट काम करत नाहीत अशावेळी अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे रिफ्लेक्टिव्ह रेडियम टेप आणि रिफ्लेक्टर कापड याचा वापर करण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

तसेच जिल्हयातील उर्वरित 05 कारखान्यासाठी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना देगांव-येळेगांव ता.अर्धापूर, येथे सहायक मोटार वाहन निरिक्षक श्रीमती तेजस्विनी कलाले, एम.व्ही. के. अॅग्रो वाघलवाडा ता. उमरी सहायक मोटार वाहन निरिक्षक श्री. हेमंत साळुंके, श्री. सुभाष सागर, प्रा.लि. हडसणी ता. हदगांव श्री. पंकज कंतेवार, शिवाजी सर्व्हिस स्टेशन लि.बा-हाळी ता.मुखेड सुनिल जारवाल, कुंटूरकर शुगर अॅन्ड अॅग्रो प्रा.लि. कुंटूर ता. नायगांव . संजय भोसले या कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येवून मा. प्रादेशिक परिवहन अधिकारी . विनय अहिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक प्रादेशिक परिवहन, नांदेड . संदिप निमसे यांच्या उपस्थितीत वाहन चालकांना सुरक्षित वाहतुक होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येवून कारखान्याच्या ठिकाणी असलेल्या रिफलेक्टर टेप लावण्यात आलेले आहे.असून दिनांक 01 जानेवारी 2025 पासून परिवहन विभागामार्फत जिल्हयातील सर्व रस्त्यावर तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून येणार असून त्यांनी नमूद केलेल्या बाबीचे उल्लंघन करताना आढळून आल्यास त्यांचेविरुध्द मोटार वाहन कायदयातील तरतूदीनुसार कारवाई होणार असल्याचे सांगितले.

*सायकली, दुचाकी बैलबंड्याना रिफ्लेक्टर लावा* 

यासंदर्भात साखर कारखान्यातील वाहतूक व्यवस्थेची संपर्क साधला असला तरी अन्य छोटी वाहने सायकली बैल बंड्या व दुचाकी वाहने चालवताना रिफ्लेक्टिव्ह रेडियम टेपचा अधिकाअधिक वापर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनयकुमार अहिरे यांनी केले आहे. अल्प किमतीच्या या रिफ्लेक्टर मुळे रात्रीच्या वेळी मोठी सुरक्षा प्रदान होते. तसेच नागरिकांनी रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या रिफ्लेक्टरची सुरक्षाही सामाजिक जाणीवेतून करावी, सुरक्षा आदेशाचे पालन करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

श्री अहिरे यांनी भारतामध्ये होत असलेल्या अपघातांची संख्या बघता प्राथमिक सूचनांचे देखील पालन महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे रिफ्लेक्टिव्ह रेडियम टेप रिफ्लेक्टर कापड मोठ्या संख्येने वापरण्यात यावा असे, आवाहनही केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!