*३ दिवस रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू राहणार*
नांदेड : -नाताळ (ख्रिसमस) व नववर्षानिमित्ताने (३१ डिसेंबर) विदेशी मद्य किरकोळ विक्रीची, बियर विक्रीची, परवाना कक्ष,क्लब परवाना असलेली तसेच मद्य विक्रीची दुकाने २४ डिसेंबर,२५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबरला निर्धारित वेळेनंतर रात्री १०.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत तर काही दुकाने पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.
यामध्ये एफएल -२ (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान), एफएलबीआर -२ (बंद बाटलीतून बीअर विक्री) दुकाने रात्री १०:३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत तर एफएल -३ (परवाना कक्ष) असलेली मद्यविक्रीची दुकाने आणि एफएल -४ (क्लब परवाना असलेली मध्यविक्रीची दुकाने) रात्री ११.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत आणि सीएल -३ प्रकारातील मद्यविक्रीची परवाना दुकाने अ व ब वर्गाच्या नगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री १० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
यासोबतच या दोन्ही सणाला साजरे करताना मद्य सेवन करताना आवश्यक परवाना सोबत बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.गेल्या वर्षभरात अशा पद्धतीने अनधिकृतपणे मद्य प्राशन करताना आढळलेल्या पाच प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
*एक दिवसाचा परवाना*
31 डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतार्थ पार्टी अथवा मेजवानी आयोजित करायची असेल व मद्यसेवनाचे आयोजन करायचे असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने एक दिवसाच्या विशेष परवानाची तात्काळ सोय उपलब्ध आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन एक दिवसाचा परवाना मिळू शकतो, असेही विभागाने कळविले आहे. यासाठी एक्साईज सर्विस महा ऑनलाईन या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत या काळात सहा पथके तयार करण्यात आली असून ही सहा पथके मद्य निर्मितीमध्ये विक्री व वाहतुकीवर विशेष लक्ष देणार आहे.
पहाटे पाच पर्यंत परमिट रूमला नववर्षाच्या स्वागताला परवानगी देण्यात आली आहे . मात्र अवैध धाबे, हॉटेल, खानावळ, रिसॉर्ट या ठिकाणी होणाऱ्या पार्ट्यांवर विभागाचे लक्ष राहणार असून विनापरवानगी मालकाने परवानगी दिल्यास मालकावर, चालकावर तसेच मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल,असेही राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी कळविले आहे.
नागरिकांनी ख्रिसमस व 31 डिसेंबर नववर्षाचे स्वागत नियमांचे पालन करून साजरे करावे, तसेच सार्वजनिक शांततेस बाधा न पोचविता अधिकृत लायसन्स जवळ बाळगून मद्य सेवन करावे व अनधिकृत ठिकाणी सण उत्सव साजरे करण्यास जाऊ नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने जारी केलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.