मराठवाड्यातील दोन्ही विद्यापीठाची घोडदौड सुरू

आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धा: ‘बामू’ व ‘स्वारातीम’ ची साखळी सामन्याकडे वाटचाल

नांदेड-विद्यापीठ क्रीडा मैदानावर सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरुष) स्पर्धेत चौथी फेरी गाठत यजमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडसह मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या दोन्ही संघांनी विजयी घोडदौड कायम राखत साखळी सामन्याकडे आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.

सोमवारी झालेल्या बाद फेरीच्या सामन्यात यजमान नांदेड संघाने श्री बालाजी विद्यापीठ पुण्याचा २५-१३, २५-१६, २५-१७ असा सरळ तीनसेटमध्ये पराभव करीत आगेकूच केली आहे. छत्रपती संभाजी नगरच्या बामू विद्यापीठाने राजा एसएस विद्यापीठ छिंदवाडा संघाला ३-० ने धुळ चारत विजयी वाटचाल सुरू ठेवली आहे. राणी दुर्गावती विद्यापीठ जबलपूर संघाने मुंबई विद्यापीठाचा अतिथटीच्या सामन्यात ३-१ ने प्रभाव केला. पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठ शिखर संघाने पौर्णिमा विद्यापीठ राजस्थानचा २५-१३, २५-११, २५-१८ असा सरळ पराभव केला. अजमेरच्या एमडीएस विद्यापीठाने अटीतटीच्या सामन्यात मुंबईच्या सौमय्या विद्यापीठाचा ३-२ ने पराभव केला. जयपूरच्या राजस्थान विद्यापीठाने साताऱ्याच्या कर्मवीर भाऊसाहेब विद्यापीठाचा ३-१ ने पराभव करीत आगे कूच केली आहे. पारूल विद्यापीठ बडोदरा संघाने अवधेश प्रतापसिंह विद्यापीठ रेवा चा ३-० ने पराभव केला. अहमदाबादच्या लोकजागृती केंद्र विद्यापीठाने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा ३-० ने एकतर्फी धुवा उडवत विजय मिळवला. तत्पूर्वी यजमान नांदेड विद्यापीठ संघाने गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाचा २५-११, २५-१६, २५-१७ ने पराभव केला. यासह बामू विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरने  ग्वाल्हेरच्या जीवाजी विद्यापीठाचा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला.

मंगळवारपासून साखळी सामने………. गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या या स्पर्धेत बाद फेरीतील लढती तुल्यबळ होत आहेत. साखळी सामन्यातील प्रवेशासाठी प्रत्येक संघ धडपडत असून मंगळवारी सकाळच्या सत्रात पात्रता फेरीचे चार सामने होणार असून सांयकाळच्या सत्रात साखळी सामन्याला सुरुवात होणार आहे. गत वर्षातील पहिले चार संघ व यावर्षी बाद फेरीतील चार संघ यातील विजयी संघ साखळी स्पर्धेसाठी पात्र ठरतील.

या स्पर्धेसाठी पंच प्रमुख पी.एस. पंत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे पंच तसेच क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, स्पर्धा समन्वयक अंकुश पाटील, अंजली पाटील, विक्रम कुंटूरवार, राजकुमार दहिहंडे, सचिन पाळणे, नीरज उपलंचवार, डॉ. तातेराव केंद्रे, महेश पाळणे, डॉ. महेश बेबडे यांच्यासह पंच सौरभ रोकडे, चंद्रकांत फुलकुटवार, नितीन कान्हडे, अखिलेश ढोणे, प्रशांत बिराजदार, विठ्ठल कवरे, रणजीत राठोड, महंमद कासिम, सुनील मुनाळे, जयश्री खडसे, शहाबाज पठाण, सोनाजी बोरकर, रोशनी भालवी, साक्षी बडवणे आदि परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!