पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हॉलीबॉल स्पर्धा
नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हॉलीबॉल (पुरुष) स्पर्धेत विजयी सलामीच्या सामन्यात मुंबई विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर व सिल्वरओक विद्यापीठ, अहमदाबादने या स्पर्धेत विजयी सलामी देत आगे कूच केली आहे.
दि. १४ डिसेंबर पासून सुरू झालेल्या (पुरुष) आंतर विद्यापीठ हॉलीबॉल स्पर्धेत ११८ विद्यापीठांनी सहभाग नोंदविला आहे. इनडोअर व आउटडोअर मैदानावर खेळाडू आपले कौशल्य पणाला लावत आहेत. सलामीच्या सामन्यात गुजरातच्या सकलचंद पटेल विद्यापीठाने जयपूरच्या विवेकानंद विद्यापीठाचा ३-० ने पराभव केला. दुसऱ्या सामन्यात अहमदाबादच्या सिल्वरओक विद्यापीठाने कोटा विद्यापीठाचा एकतर्फी पराभव केला. वडोदरा परोल विद्यापीठाने बुंदेलखंड विद्यापीठाचा ३-० असा पराभव केला. वडोदरा विद्यापीठाने जयपूर विद्यापीठाचा, राजकोटच्या मारवाडी विद्यापीठाने पिंदवाडा विद्यापीठाचा ३-० ने पराभव केला. गोवा विद्यापीठाने भोपाळच्या जगरान विद्यापीठाचा एकतर्फी धुव्वा उडविला. यासह भोपाळच्या राजीव गांधी विद्यापीठ, गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने तसेच वाफिच्या राजीव श्रॉफ विद्यापीठाने प्रतिस्पर्धीवर मात करीत आगे कूच सुरू ठेवली आहे.
इनडोअर मैदानावर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई विद्यापीठाने देवी अहिल्या विद्यापीठ इंदोरचा ३-१ ने पराभव केला. या चुरशीच्या सामन्यात सरदार पटेल विद्यापीठाने उदयपूरच्या भोपाळ विद्यापीठाचा व रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ भोपालने राजऋषी मत्स्य विद्यापीठ अलवारचा ३-२ ने पराभव केला. गुजरात टेक्निकल विद्यापीठ अहमदाबाद, बालाजी विद्यापीठ पुणे व गुजरातच्या चारोधर विद्यापीठाने प्रतिस्पर्धावर मात करीत दुसरी फेरी गाठली आहे.
या स्पर्धेसाठी पंचप्रमुख पी.एस. पंत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल असोसिएशनचे पंच, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, स्पर्धा समन्वयक अंकुश पाटील, अंजली पाटील, विक्रम कुंटूरवार, राजूकुमार दहीहंडे, नारायण उपलंचवार, विक्रम पाटील, लिंबराज बिडवे, सुधीर दापके आदी परिश्रम घेत आहेत.