नांदेड(प्रतिनिधी)-कारागृहात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीसासोबत कारागृह अधिक्षक यांनी जाती वाचक उच्चार केल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. तसेच कारागृह अधिक्षकांच्या तक्रारीवरुन महिलेविरुध्द सुध्दा गुन्हा दाखल झालेला आहे.
नांदेड कारागृहात कार्यरत एका 33 वर्षीय अनुसूचित जातीच्या पोलीस महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिने या अगोदर चांदणे नावाच्या कारागृह अधिक्षकाविरुध्द विनयभंगाची तक्रार दिली होती. सध्या तो प्रकार जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे. त्यानंतर सध्याचे कारागृह अधिक्षक ज्ञानेश्र्वर खरात यांनी या महिलेला चांदणे विरुध्दची तक्रार परत घे म्हणून अनेकवेळेस सांगितले. पण ती जोड जमली नाही. महिलेच्या तक्रारीनुसार 11 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा त्यांना चांदणे विरुध्दची केस परत घेण्यास सांगितले. 23 सप्टेंबर ते 9 डिसेंबर 2024 दरम्यान वारंवार ती केस परत घेण्यास सांगितले. पण त्या महिलेने 9 डिसेंबर 2024 रोजी तक्रार दिली होती. त्यात महिलेसोबत जातीचा उल्लेख करून कारागृह अधिक्षक ज्ञानेश्र्वर खरात बोलत होते असा अर्ज आहे. या बाबत 14 डिसेंबर 2024 रोजी नांदेड येथील वजिराबाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 296, 352, 351(2), 351(3) तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 मधील कलम 3(1)(आर), 3(1) (एस) प्रमाणे गुन्हा क्रमांक 406/2024 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास शहर उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका यांच्याकडे देण्यात आला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील महिलेविरुध्द सुध्दा वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. पण तो कोणत्या संदर्भाचा आहे. त्यात कलमे कोणती जोडली आहेत. त्या गुन्ह्याचा तक्रारदार कोण आहे याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला पण ती माहिती प्राप्त झाली नाही.