नांदेड(प्रतिनिधी)-उधारीचे पैसे परत देण्याऐवजी रेल्वे विभागात नोकरी लावतो असे सांगून काही जणांनी त्याला खोटे नियुक्ती पत्र देवून मुंबई येथे पाठविले आणि तेथील खाजगी कंपनीत काम करायला सांगितले. नियुक्ती पत्र खोटे असल्याचे समजल्यावर या बाबत तक्रार देण्यात आली आहे. एकूण 13 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
कृष्णकुमार मल्लू मुंडकर यांचे तामसा येथे जयहरी कृषी सेवा केंद्र आहे. त्यांनी गजानन लामतुरे, पवन भुतडा, उज्वला रविंद्र वठारकर या तिघांना भुखंड खरेदी करण्यासाठी 6 लाख रुपये व दवाखान्यासाठी 7 लाख रुपये असे 13 लाख रुपये नोव्हेंबर 2022 मध्ये दिले होते. त्यानंतर तुमचे पैसे परत देणे होणार नाही या मोबदल्यात मी तुम्हाला रेल्वे विभागात नोकरी लावून देतो असे सांगून आरोपींनी कृष्णकुुमार मुंडकरला वारणसी, दिल्ली, चेन्नई, मुंबई येथे नेले. तेथेच काही दिवस ठेवून रेल्वेत नोकरीचे खोटे नियुक्ती पत्र व ओळखपत्र तयार करून दिले. तसेच मुंबईच्या चेंबुरमध्ये एका खाजगी कंपनीत काम करायला सांगितले. तपासणी केली तेंव्हा नियुक्तीपत्र व ओळखपत्र खोटे असल्याचे समजले. त्यानंतर तक्रार देण्यात आली. पोलीस ठाणे तामसा येथे या प्रकरणी गुन्हा क्रमांक 143/2024 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक नरोटे यांच्याकडे देण्यात आला आहे.