नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर घडलेल्या प्रकारात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांची हकालपट्टी करावी तसेच दलित वस्तीमध्ये आई्र-बहिणांना त्रास देणाऱ्या पोलीस निरिक्षक पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड आणि त्यांच्या सहकारी पोलीस निरिक्षकांना निलंबित करावे आणि त्यांच्याविरुध्द ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर यांनी केली आहे.
नांदेडमध्ये परभणीच्या घटनेच्याविरोधात निदर्शने करतांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर हे बोलत होते. परभणीमध्ये क्रिया झाली आणि त्याची प्रतिक्र्रिया उमटली यावर प्रशासन अनुसूचित जातीच्या नागरीकांना त्रास देत आहे. आपण एखादा चेंडू भिंतीवर फेकला तर तो भिंतीवरून परत आपल्याकडे येतो. अशाच पध्दतीची प्रतिक्रिया जीवनात घडते. त्यामुळे प्रतिक्रिया होवू नये ही आमच्याकडून असलेली प्रशासनाची अपेक्षा चुकीची असल्याचे पालमकर सांगतात.
परभणी येथे प्रतिक्रिया घडल्यानंतर प्रशासनातील जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांनी चुकीच्या पध्दतीने हाताळणी केली आणि प्रतिक्रिया उग्र झाली. या प्रसंगी परभणीच्या एलसीबीचे पोलीस निरिक्षक ज्यांची परभणीतून सुध्दा बदली झालेली आहे असे अशोक घोरबांड आणि त्यांचे सहकारी पोलीस निरिक्षक या दोघांनी पोलीस ताफ्यांसह जावून दलित वस्तीमध्ये आया-बहिणींना दिलेला त्रास हा सुध्दा आम्ही सहन करणार नाही. येत्या 1 जानेवारी पर्यंत परभणीचे जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांची हकालपट्टी प्रशासनाने करावी तसेच पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड आणि त्याचा सहकारी पोलीस निरिक्षक या दोघांविरुध्द ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी पालमकर यांनी केली. आम्ही केलेली मागणी 1 जानेवारीपर्यंत मान्य झाली नाही तर आम्ही नांदेडमध्ये एक नवीन आंदोलनाची तयारी करू असेही पालमकर सांगतात.