इतर मागासवर्गीय महामंडळाच्या विविध कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्या उपकंपनी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ व संतसेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ या तिन्ही महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण कल्याणाकरिता बेरोजगारांसाठी, स्वयंम उद्योगासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजु व कुशल व्यावसायिक व्यक्तींना कृषी सलग्न व पारंपारीक उपक्रम व लघु उद्योग व मध्यम उद्योग उत्पादन, व्यापार विक्री सेवाक्षेत्र इत्यादी व्यवसाय करीता या महामंडळाच्या नांदेड जिल्ह्याकरीता सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मुख्यालय स्तरावरून उद्दीष्ट प्राप्त झाले आहे.

एक लाखापर्यंतची थेट कर्ज योजना

या योजनेत अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 पेक्षा जास्त असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा कमी असावे. परतफेडीचा कालावधी 48 समान मासिक हप्त्यांमध्ये राहिल. नियमीत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेत व्याज अदा करावे लागणार नाही परंतू थकित झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे. 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल.

20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना

या योजनेमध्ये 75 टक्के रक्कम ही बँकेची असून त्यावरील व्याज हे बँकेच्या नियमाप्रमाणे राहील. 20 टक्के रक्कम ही महामंडळाची असून त्यावर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज आकारण्यात येते व 5 टक्के सहभाग हा लाभार्थ्यांचा आहे. या योजनेची कर्ज मर्यादा रुपये 5 लाखापर्यंत असून परतफेडीचा कालावधी पाच वर्षाचा समान 60 हप्त्याचा आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा 10 लाख रुपयापर्यंतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. या योजनेत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाखापर्यंत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादित) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्याच्या आधारलिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. तसेच लाभार्थ्यांने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरू असल्याचे किमान दोन छायाचित्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना

सदर योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा 10 ते 50 लाख रुपयापर्यतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. गटातील लाभार्थ्याचे वय 18 ते 45 वर्षे असावे. गटातील लाभार्थ्यांनी यापूर्वी महामंडळाचा किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. इतर मागास प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्या देतील. उमेदवाराचे बचतगट, भागीदार संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत) एलएलपी, एफपीओ अशा शासन प्रमाणीकरण प्राप्त संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा देशांतर्गत व परदेशी उच्च शिक्षणासाठी कर्ज मर्यादा 10 ते 20 लक्ष रुपयापर्यतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांचे वय 17 ते 30 वर्षे असावे. अर्जदाराची कुटुंबिक वार्षीक उत्पन्न मर्यादा 8 लक्ष रुपये असावे. विद्यार्थी बारावीत 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाण‍िकरणानुसार महामंडळाकडून अदा केले जाईल.

महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजना  

ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालीत साधन केंद्र (CMRC) मार्फत राबविल्या जात आहे. इतर मागास प्रवर्गातील किमान 50 टक्के महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटास प्रथम टप्यात 5 लाख रुपया पर्यंत कर्ज बँकेमार्फत उपलद्ध करून घेण्यास मान्यता देण्यात येईल. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादित) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्यांच्या आधारलिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

या विविध कर्ज योजना बँकेमार्फत असून लाभार्थ्यांनी महामंडळाच्या संकेतस्थळावर www.msobcfdc.org ऑनलाईन अर्ज भरावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड-431605 दूरध्वनी क्र. 02462-220865 अथवा www.msobcfdc.org या वेबसाइट संपर्क साधावा. या योजनेचा लाभ इतर मागासवर्गीय समाजातील व्यक्तिने जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!