क्युआर कोडचा वापर करुन ध्वजदिन निधीत रक्कम करता येणार जमा
नांदेड :- ध्वजदिन निधीच्या माध्यमातून सैनिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कुटूंबाच्या कल्याणासाठी हा निधी संकलित करण्यात येतो. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2024-25 संकलन उद्दिष्ट 1 कोटीपर्यत करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सशस्त्र ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, वीरपिता, वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक यांच्या उपस्थितीत ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला.
ध्वजदिन निधी संकलनासाठी यावेळी क्युआर कोडचा वापर करुन निधी संकलन करता येणार आहे. क्युआर कोडच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यत पोहचून जास्तीत जास्त निधी संकलित करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना योगदान देण्याबाबत आवाहन केले. तसेच माजी सैनिकांच्या इतर मागण्याबाबतही दर तीन महिन्याला बैठक आयोजित करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यातील युवकांना सैन्यात भरती होण्यासाठी शासकीय यंत्रणाच्या माध्यमातून मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मागील वर्षात ज्या विभाग प्रमुखांनी ध्वजनिधी संकलनात विशेष योगदान दिले त्यांचे अभिनंदन करुन त्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी वीरपीता धोंडीबा शेटोबा जोधळे, वीरपत्नी अरुणाताई टर्के,वीरपीता व वीरमाता आशाबाई व गणपतराव गोंविदे, वीरपत्नी शितल संभाजी कदम, वीरपिता श्रीराम डूबुकवाड यांचा सन्मान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विशेष गौरव पुरस्कार कुमार अविष्कार मोरे, कुमारी नंदिनी कांगणे या सैनिकांच्या पाल्याचा विशेष गौरव करुन प्रत्येकी 20 हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या हस्ते दिला.
कार्यक्रमाची सुरूवात शहिदांना श्रद्वांजली वाहून करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी प्रास्ताविकात ध्वजदिन निधीचे महत्व सांगून संकलित झालेल्या निधीचा विनियोग व माजी सैनिकांच्याच्या पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना कशा राबविण्यात येतात यांची माहिती दिली. तसेच माजी सैनिकांसाठी सीएसडी कॅण्टीन, सैनिक संकुलन व भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे सुरु करण्याबाबत विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अन्वर शेख यांनी केले तर कल्याण संघटक कॅप्टन विठ्ठल कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हयातील माजी सैनिक, विधवा, अवलंबित उपस्थित होते. माजी सैनिक संघटनांचे अध्यक्ष रामराव थडके, पठाण हयुन, एल.देवदे, विकास बल्फेवाड, ज्ञानेश्वर पाटील डुमने, कमलाकर शेटे इत्यादी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयाचे कल्याण संघटक, विठ्ठल कदम, होस्टेल अधीक्षक अर्जून जाधव, लिहिक अनिल देवज्ञे, सुर्यकांत कदम यांनी प्रयत्न केले.