नांदेड येथील युवकांनी नशेच्या आहारी जाऊ नये -संतबाबा बलविंदरसिंघजी

 

सिख संगतने काही नशेडी पकडले

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील एका यात्री निवासमध्ये शहरातील सिख संगतने (जनता) काही नशेडी लोकांना पकडल्यानंतर नशेचा कारभार नांदेडमध्ये जोरदारपणे आपले पाय पसरत आहे, हा भाग समोर आला. लंगर साहिब गुरूद्वाराचे संतबाबा बलविंदरसिंघजी यांनी युवकांना नशेपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच नांदेड येथील पवित्र नगरीत कोणी असा व्यवसाय करत असेल तर ती बाब सुद्धा चुकीची असल्याचे सांंंंगितले.

आज सकाळी गुरूद्वाराजवळ असलेल्या नानकसर कुराली यात्री निवास येथे सिख संगतमधील काही युवकांनी चार जणांना पकडले. त्या चार जणांकडे नशा करण्यासाठी लागणारे साहित्य सापडले. हे साहित्य म्हणजे ड्रग्ज आहेत, असे युवक सांगत होते. या ड्रग्जची नशा करताना 20 रूपयांची भारतीय चलनातील नोटेची पुंगळी करून त्याद्वारे नाकाने ती नशा ओढली जाते, असे तेथील युवक सांगत होती. या लोकांना पुर्वी सुद्धा एकदा पकडण्यात आले होते. आज पकडलेले चार जण या यात्रीनिवासमध्ये मागील एक महिन्यापासून राहत होते, असे युवकांनी सांगितले. त्यांना नशेच्या वस्तू देणाऱ्या काही जणांची नावे त्या लोकांनी संगतला सांगितले आहेत. पण कार्यवाही काहीच झाली नाही. आज या चार जणांना पकडल्यानंतर हे सर्व जण पुर्ण नशेत होते, असे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मग सिख संगतमधील युवकांनी संतबाबा बलविंदरसिंघजी यांना बोलावून घेतले आणि घडलेला प्रकार पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा दु:खच झाले. त्या ठिकाणी हजर असलेले युवक सांगत होते की, पंजाबमधून अनेकजण हा नशेचा कारभार चालवतात आणि तो व्यवस्थीतपणे सुरू आहे. नांदेडमध्ये दररोज ड्रग्जचे शंभर इंजेक्शन युवक घेत असल्याची शंका तेथे हजर असलेले युवक करत होते. काही जणांनी असे सांगितल्याचे बोलले जात होते की, पुढच्या तीन महिन्यांत पुर्ण नांदेड शहर आम्ही नशेने ग्रस्त करून टाकणार आहोत. पण आता ही नशा कोण मागवते, कोणाच्याद्वारे ती नशा वितरीत होते. कोण त्यांना संरक्षण देते हे मुद्दे सुद्धा महत्वपूर्ण आहेत. नांदेडमध्ये अनेक मेडीकल दुकानांवर सुद्धा नशेचा गोळ्या बिना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळतात. हा सुद्धा महत्वपूर्ण भाग आहे. अन्न व औषधी प्रशासन कधीच मेडीकलमध्ये तपासणी करताना दिसत नाही. मेडीकलमध्ये मिळणाऱ्या नशेचा गोळ्या तर सोडाच पण सर्वसामान्य औषधींबद्दल तिचा विक्रीदर खरा आहे की, रूग्णांना लुटणारा आहे याची तपासणी सुद्धा होत नाही. अशा प्रकारे अन्न व औषधी प्रशासन सुद्धा आपल्या कर्तव्याला पूर्णपणे न्याय देत नाही. तेव्हा नांदेड शहर नशेने वेढला जाईल, यात आज तरी शंका व्यक्त करायला जागा नाही.

युवकांनी पकडलेल्या चार जणांना त्यांनी पोलिसांच्या हवाली केले आहे. वजिराबादचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडे असलेल्या नशेच्या पदार्थाची संख्या आणि त्याचे वजन हे कायद्याला अभिप्रेत असलेल्या चौकटीत बसत नाही, पण आम्ही त्याची तपासणी करत आहोत, आणि तपासणीमध्ये आलेल्या तथ्यांप्रमाणे कायदेशीर कारवाई करणार आहोत.

नानकसर कुराली यात्री निवास येथे आलेले लंगर साहिब गुरूद्वाराचे संतबाबा बलविंदरसिंघजी यांनी सांगितले की, नांदेड सारख्या पवित्र नगरीमध्ये नशेचा व्यापार होणार असेल आणि माझे युवक त्या नशेच्या आहारी जाणार असतील तर यापेक्षा मोठे दुर्देव दुसरे नाही. आमच्या गुरू महाराजांनी शिकवलेल्या शिकवपणीप्रमाणे नशेचा व्यापार करून इतरांचे वाईट घडेल यावर जो कोणी काम करेल त्याला याची फळे भोगावी लागतील. माझ्या युवकांनी अर्थात नांदेडच्या युवकांनी सुद्धा नशेच्या कारभारापासून दूर रहावे, नशा करू नये आणि नशा कोणी करत असेल तर त्याचा विरोध करत त्याला योग्य दिशा द्यावी. कोणी नशेचा व्यापार करणारे लोक सापडले तर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करावे. जेणे करून नांदेडमध्ये नशा आपले पाय रोवू शकणार नाही आणि सर्व सुरक्षीत राहू, असे संतबाबा बलविंदरसिंघजी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!