कष्टकर्‍यांच्या हित रक्षणासाठी मविआला विजयी करणार; डाव्या आघाडीच्या बैठकीत निर्धार

नांदेड(प्रतिनिधी)-कामगार, कर्मचारी, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या हित रक्षणासाठी नांदेड लोकसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि डावी लोकशाही आघाडीतील कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार डावी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर यांनी  व्यक्त केला.
नांदेड लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा.रविंद्र चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघाबाबत डावी लोकशाही आघाडीची बैठक सपाचे ज्येष्ठ नेते डॉ.पी.डी.जोशी पाटोदेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत माकपच्या कॉ.उज्ज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड, सपाचे सूर्यकांत वाणी, आबेद पटेल, भाकपचे कॉ.गणेश संदुपटला, कॉ.वंदना गायकवाड, कॉ.वैशाली धुळे यांच्यासह कॉंग्रेसकडून लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार रविंद्र चव्हाण यांचे प्रतिनिधी म्हणून माजी उपमहापौर आनंद चव्हाण, कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष एकनाथ मोरे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात भाजपाच्या नेतृत्वातील महायुती सरकारने कामगार, कर्मचारी, कष्टकरी विरोधी धोरणे राबवून सर्वसामान्यांचे जीवन असह्य केले. एकीकडे लाडकी बहीण योजनेसारख्या फसव्या योजनेच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे महागाई वाढवून मतदारांच्या खिशातून पंधरा हजार रुपये लुटायचे. महायुती म्हणजे घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीत डावी लोकशाही आघाडीचे सर्व कार्यकर्ते कॉंग्रेस व मविआच्या उमेदवारांना विजयी करणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला. डॉ.पाटोदेकर यांनी अध्यक्षीय समारोप करतांना भाजपसह महायुतीच्या धोरणांवर टीका केली. कॉंग्रेसचे एकनाथ मोरे यांनी डावी आघाडी आणि कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांच्या भरघोस मतदानातूनच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी कॉ.उज्ज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात भाकप मालेचे कॉ.दिगंबर घायाळे यांच्यासह सफाई कामगार, वीडी कामगार, विद्यार्थी, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!