नांदेड :- भारत निवडणूक आयोगाने आचारसंहितेमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे निवडणूक प्रचारादरम्यान महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे. प्रचारादरम्यान महिलांसंदर्भात कोणतीही आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात येऊ नये, तसेच मुलांचा वापर प्रचारामध्ये कुठेही होणार नाही. याची सर्व राजकीय पक्षानी तसेच उमेदवारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्यात येत असून अशा वेळी प्रचारासंदर्भातील आदर्श आचारसंहितेचे पालन करणे अत्यावश्यक आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज या संदर्भात प्रशासनातर्फे सर्व उमेदवारांना तसेच राजकीय पक्षांना याबाबत सूचना केली आहे.
अनेक ठिकाणी प्रचारामध्ये शाळकरी मुलांचा किंवा लहान मुलांचा अनावधानाने वापर केला जातो मात्र हा आचारसंहितेचा भंग ठरतो. यासंदर्भात तक्रारी आल्यास त्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या प्रचारामध्ये कुठेही लहान मुलांचा वापर होणार नाही, याची काळजी घ्यावी.
उमेदवारांनी प्रचारादरम्यान आपली उपलब्धी आपले भविष्यातील नियोजन सांगताना कुठेही महिलांबाबत आपत्तीजनक टिप्पणी अजानतेपणे का होईना सार्वजनिक होणार नाही, याची काळजी घ्यावी. महिलांसंदर्भातील अनावश्यक टिप्पणी, अनादर अपमानजनक शब्द, लज्जा निर्माण होईल असे शब्द वापरल्यास आचारसंहिता भंग केल्याचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहे. त्यामुळे यासंदर्भात काळजी घ्यावी. असे आवाहनही त्यांनी केले आहे.