नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर पोलीस विभागाने चार वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 24 लाख 9 हजार 950 रुपयांची रक्कम जप्त केली आहे. जप्त झालेली सर्व रक्कम पोलीस विभागाने निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केली आहे.
पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार 5 नोव्हेंबर रोजी रात्री नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार हरिश मांजरमकर यांनी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार वाजेगाव चौकी ते मुदखेड रस्त्यावरील एका ठिकाणी एका व्यक्तीस थांबवून तपासणी केली असता त्याच्याकडे 99 हजार 400 रुपये रोख रक्कम मिळाली.
दि.5 ऑक्टोबर रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतच लातूर फाटा येथे हिरो शोरुम समोर एका व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्याकडे 1 लाख 34 हजार 250 रुपये रक्कम सापडली.
देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदनुर नाका येथे तपासणी दरम्यान दुचाकीवर असलेल्या हॅंड बॅगमध्ये 1 लाख 76 हजार 300 रुपये एवढी रोख रक्कम सापडली. भवानी चौक देगलूर येथे एक व्यक्ती मोटारसायकलवर 20 लाख रुपये रोख रक्कम सापडली. या सर्व रक्कमेबाबत एफएसटी, आयटी या विभागांना सुध्दा सुचित करण्यात आले आहे. निवडणुक आयोगाच्या ईएसएमएस या पोर्टलमध्ये जप्त रक्कमेच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. या बाबत सर्व चौकशी झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव आदींनी नांदेड पोलीसांचे कौतुक केले आहे.