नांदेड – लोकशाहीमध्ये निवडणूक कार्य हे राष्ट्रीय कर्तव्य असून दोन दिवसांच्या कामाचा विनाकारण बाऊ कोणी करू नये. अशा प्रकारे प्रशिक्षणासाठी दांड्या कोणी मारत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी सूचना नांदेड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केल्या.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व लोकसभा पोट निवडणूकीसाठी 87 नांदेड दक्षिण विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूक अनुषंगिक कामाचा आढावा घेतांना यातील अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी गांभीर्य लक्षात न घेता अनुपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले. विशेषतः जी.एस.टी.विभाग, अनेक बि.एल.ओ. तथा पर्यवेक्षक यांची अनुपस्थिती होती. अशा अनुपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मधील कलम 134 मध्ये असलेल्या तरतुदीनुसार तात्काळ गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिले. या बैठकीस तहसीलदार प्रविण पांडे , नितेशकुमार बोलेलू, नायब तहसीलदार यांची उपस्थिती होती.