नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील दोन कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्यांच्या बॅंक खात्यातील 70 हजार रुपये काढून घेतल्याप्रकरणी बिलोली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बेळकोणी ता.बिलोली येथील साईनाथ सायन्ना बुध्देवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 ऑक्टोबर 2015 ते 5 मे 2021 दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक कासराळी येथे यु.एस.पाटील आणि एस.एस.सुरकुठे या दोघांनी बुध्देवार यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या बचत खात्यातील 70 हजार रुपये काढून घेतले. बुध्देवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 285/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास बिलोलीचे पोलीस उपनिरिक्षक दिलीप मुंडे हे करीत आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत शासनाने दिलेल्या आणि शेतकऱ्यांच्या मालकीच्या अनुदानातील रक्कमेत घोटाळा होतो असा अर्ज दैनिक रिपब्लिकन गार्डचे संपादक विजय सोनवणे यांनी दिलेला आहे. आता बिलोलीच्या जिल्हा बॅंके शाखेत घडलेला हा 70 हजार रुपयांचा घोटाळा त्या बॅंकेतील कर्मचाऱ्यांनीच केला आहे. म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत असे अनेक घोटाळे होत आहेत हे पुन्हा एकदा समोर आले. आता तरी या बॅंकेचे ऑडीट होणे आवश्यक आहे. तरच बॅंकेमध्ये आजपर्यंत असे किती घोटाळे झाले ही बाब समोर येईल आणि दोषी व्यक्तींना शिक्षा मिळेल.