नांदेड(प्रतिनिधी)-गुंठेवारी करून देण्यासाठी 21 हजार 500 रुपयांची लाच स्विकारणाऱ्या मनपा प्रभारी सहाय्यक आयुक्तांला आणि प्रभारी वसुल लिपीकाला विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी दोन दिवस अर्थात 18 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे .
काल दि.15 ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 6 सिडको येथे एका तक्रारदाराच्या दोन भुखंडांची गुंठेवारी करून देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 6 सिडको येथील प्रभारी सहाय्यक आयुक्त संभाजी माधवराव काष्टेवाड आणि त्याच कार्यालयात प्रभारी वसुली लिपीक असलेल्या महेंद्र जयराम पठाडे या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 21 हजार 500 रुपयांची लाच घेतांना पकडून त्यांच्याविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
आज पोलीस निरिक्षक स्वप्नाली धुतराज, पोलीस अंमलदार गजेंद्र मांजरमकर, दाबनवाड आणि सचिन गायकवाड यांनी संभाजी काष्टेवाड आणि महेंद्र पठाडेला न्यायालयात हजर केले. जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस कोठडी देणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. दोन आरोपींच्यावतीने ऍड.आय.सी.जोंधळे आणि ऍड.मनिष शर्मा (खांडील) यांनी पोलीस कोठडी देण्यासारखा प्रकार नाही असा युक्तीवाद केला. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश मराठे यांनी काष्टेवाड आणि पठाडेला दोन दिवस अर्थात 18 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…
भुखंडांची गुंठेवारी करण्यासाठी 21 हजार 500 रुपयांची लाच घेणारे मनपाचे सहाय्यक आयुक्त व लिपीक जेरबंद