नांदेड(प्रतिनिधी)-महावितरण कंपनीच्या नांदेड येथील मुख्य अभियंत्याने ऑनलाईन मिटींग दरम्यान परिमंडळातील सहाय्यक अभियंता सचिन कोळपे यांची अत्यंत घाणेरड्या शब्दात केलेली अपमानजनक शब्दावली कोळपेंच्या मनात घर करुन गेली आणि त्यांना आपल्या खुर्चीवर बसले असतांनाच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले आहे. सबॉर्डीनेट इंजिनिअरर्स असोसिएशन (एमएससीबी) ने महावितरणच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापिकीय संचालकांसह उर्जा मंत्री, प्रधान सचिव, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महापारेशन मुंबई, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी नांदेड आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधिक्षकांना निवेदन पाठवून मुख्य अभियंत्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. नसता राज्यस्तरीय आंदोलन उभारले जाईल असा इशाराही दिला आहे. या निवेदनावर संघटनेचे सचिव अभियंता संतोष खुमकर यांची स्वाक्षरी आहे.
1 ऑक्टोबर रोजी महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता डोये यांनी एक ऑनलाईन मिटींग बोलावली होती. या मिटींगमध्ये सहाय्यक अभियंता सचिन कोळपे हजर होते. सचिन कोळपे यांच्या सोबत अत्यंत कठोर अक्षम्य आणि खालच्या दर्जाचे शब्द वापरून डोये यांनी कोळपेची अवहेलना केली. कोळपे यांची अवहेलना मुख्य अभियंता डोये यांनी ऑनलाईन मिटींगमध्येच केली नाही तर ते नेहमीच कोळपेंना तसेच करत होते. ऑनलाईन मिटींगमध्ये अर्वाच्च भाषा वापरून कार्यवाहीचे धमकी दिल्यामुळे सचिन कोळपे यांना आपल्या कार्यालयाच्या खुर्चीवर बसलेल्या अवस्थेतच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या दु:खद घटनेमुळे संर्पूण महाराष्ट्रात वीज वितरण कंपनीच्या तिन्ही कंपन्यांचे अभियंते व कर्मचारी यांच्यात संतापाची भावना निर्माण झाली आहे. डोये यांच्या अजब व तऱ्हेवाईक वागणुकीविषयी संघटनेने यापुर्वी सुध्दा महावितरण प्रकाशगड मुंबई येथील संचालक तथा अध्यक्षांना निवेदनाद्वारे माहिती दिलेली आहे. हम करे सो कायदा ही वृत्ती त्यांनी जोपासली आहे आणि त्यांच्या वाईट परिणामात एका तरुण होतकरु अभियंत्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सबॉर्डीनेट इंजिनिअरर्स असोसिएशन (एमएससीबी) यांनी कठोर शब्दात परिमंडळ नांदेडचे मुख्य अभियंता डोये यांचा तिव्र निषेध करत आहेत. त्याच सोबत प्रशासनाने मस्तवाल मुख्य अभियंता डोयेविरुध्द तातडीची कार्यवाही करावी अशी मागणी करत आहेत.
24 तासात डोयेवर निलंबनाची कार्यवाही झाली नाही तर आणि दिवंगत अभियंता सचिन कोळपे यांना मिळणाऱ्या मदतीत दिरंगाई झाल्यास संघटना कोणत्याही प्रकारचे राज्यस्तरीय आंदोलन करील असे शब्द या निवेदनात लिहिले आहेत. महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी ग्राहकांसोबत कसे वागतात ते जाऊ द्या पण आपल्या अभियंत्यांसोबत कसे वागतात याचा प्रत्यय या घटनेतून समोर आला आहे.