नेरली अतिसाराचे कवित्व अद्याप संपले नाही

नांदेड(प्रतिनिधी)-नेरलीच्या अतिसार प्रसंगाचे कवित्व अजून संपलेले नाही. कारण उपचार घेवून घरी गेलेल्या रुग्णांना पुन्हा उपचारासाठी दवाखान्यात दाखल व्हावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी दोन ग्रामसेवकांना निलंबित करून आपली कार्यवाही पुर्ण केल्याचे दाखवले आहे. आजपासून नवरात्र उत्सव सुरू झाला. माहूर गडावर आणि रत्नेश्र्वरी गडावर येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता तेथेच पिण्याच्या पाण्याची सोय योग्य होणे अत्यंत आवश्यक आहे.
नेरली गावात पाण्याच्या टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वापरलेल्या अर्ध्या गावाला अतिसाराने त्रास दिला. सुदैवाने त्या प्रकरणात जिवीत हाणी झाली नाही. पण जवळपास 700 पेक्षा जास्त लोकांनी उपचार घेतला. ती मंडळी उपचार घेवून पुन्हा कामाला लागली आणि त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला. अशा पध्दतीने नेरलीचे अनेक रुग्ण पुन्हा दवाखान्याकडे आले आहेत. काहींना वैद्यकीय सुत्राांनी दाखल करून घेतले आहे. काहींना गोळ्या-औषधी देवून परत पाठविण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार लोकांनी सांगितले की, असा प्रकार झाल्यानंतर जवळपास 2 महिने रुग्णांना आराम केला पाहिजे. तरच ते योग्यरितीने आणि पुर्णपणे बरे होतील. पण आपले काम सोडून अतिसाराने त्रासलेली जनता किती दिवस गप्प राहिल. म्हणून नेरली गावातील रुग्णांचा ओढा दवाखान्यांकडे येत आहे.
आजपासून नवरात्र महोत्सव सुरू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात माहुरगड आणि रत्नेश्र्वर गड या दोन ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. त्या ठिकाणच्या पाणी पिण्याच्या सोयींमध्ये अत्यंत शुध्दता असणे आवश्यक आहे. गर्दी जास्त असेल तर पिण्याच्या पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष झाले तर हा अतिसाराचा प्रसंग या दोन ठिकाणी उद्‌भवला तर दवाखान्यात दाखल करण्यासाठी जागा मिळणार नाही अशी परिस्थिती तयार होईल. प्रशासनाने आता तरी जनतेला पुरविला जाणार पाणी पुरवठा हा योग्य आणि शुध्द असला पाहिजे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!