नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुका होण्यापुर्वी नांदेड शहरात पोलीस आयुक्तालय तयार होईल अशी शक्यता दिसत आहे. नांदेड शहरातील सहा पोलीस ठाण्यांसोबत सोनखेड, अर्धापूर, उस्माननगर, लिंबगाव, मुदखेड अशा इतर सहा पोलीस ठाण्यांना जोडून 12 पोलीस ठाण्यांचे पोलीस आयुक्तालय तयार होईल असे अपेक्षीत आहे. महाराष्ट्रातील 13 वे पोलीस आयुक्तालय नांदेड शहरात होणार आहे.या आयुक्तालयात पोलीस आयुक्त पदावर सध्याचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांना नियुक्ती मिळेल अशा चर्चा नांदेड जिल्ह्यात होत आहेत.
महाराष्ट्राच्या गृहविभागाने 24 सप्टेंबर रोजी मागवलेल्या माहितीनुसार काही मुद्यांची माहिती त्यांना हवी आहे. त्यात नांदेड शहरातील नांदेड ग्रामीण, इतवारा, वजिराबाद शिवाजीनगर, भाग्यनगर आणि विमानतळ या पोलीस ठाण्यांसह सोनखेड, अर्धापूर, उस्माननगर, लिंबगाव, मुदखेड असे एकूण 12 पोलीस ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कक्षेत येतील. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याने पोलीस ठाणे निहाय असलेली लोकसंख्या, सन 2022 पर्यंतच्या गुन्ह्यांची आकडेवारी, सध्याच्या स्थितीत नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पोलीस ठाण्यांची संख्या धार्मिक स्थळे, इतर कारणांसाठी नांदेड शहरात येणाऱ्या-जाणाऱ्यांची सांख्यीकी. पोलीस आयुक्तालयात येणाऱ्या 12 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहरी व ग्रामीण लोकसंख्या. पोलीस आयुक्तालयात येणारी महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत यांची एकूण संख्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या लोकसंख्येची तपशीलवार माहिती मागविण्यात आली आहे.
महाराष्ट्रात 13 वे पोलीस आयुक्तालय नांदेड शहर ठरणार आहे. सध्याच्या स्थितीत निवडणुकीपुर्वीच हे पोलीस आयुक्तालय मंजुर झाले तर या जागेवर सक्षम अधिकारी असणे सुध्दा तेवढेच महत्वपुर्ण आहे. आजच्या परिस्थिती नांदेड जिल्ह्याच्या पोलीस उपमहानिरिक्षक पदावर शहाजी उमाप हे कार्यरत आहेत. त्यांनाच नांदेड शहर पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त अशी नियुक्ती मिळेल अशी चर्चा नांदेड जिल्ह्यात सुरू आहे.