बेरोजगार युवक-युवतींना 50 लाखापर्यंतच्या उद्योग उभारणीसाठी 35 टक्क्यांपर्यंत अनुदान

*मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा नांदेड जिल्ह्यातील युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन* 

नांदेड :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील युवक-युवतींना शासनामार्फत 50 लाखापर्यंतच्या उद्योग उभारणीसाठी 35 टक्क्यांपर्यंत शासकीय अनुदान योजना मिळणार आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पात्र व होतकरू सुशिक्षित बेराजगार युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

 

ही योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. या योजनेसाठी https://maha-cmegp.gov.in संकेतस्थळ असून योजनेच्या पात्रतेसाठी अर्जदार हा सर्वसाधारण प्रवर्गात 18-45 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी 18-50 वर्षे असावे लागेल. अर्जदारास आवश्यक कागदपत्रांमध्ये, पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, आवश्यकतेप्रमाणे जात प्रमाणपत्र, ग्रामीण भागाकरिता लोकसंख्येचा दाखला इत्यादी वेबसाईटवर अपलोड करावी लागतील. या योजनेतंर्गत अर्जदारांना उत्पादन व्यवसाय जसे बेकरी, मसाले, पापड उद्योग, पशुखाद्यनिर्मिती, सिलाई मशिनद्वारे कापड निर्मिती, फॅब्रीकेशन व सेवा उद्योग जसे वैद्यकीय सेवा, हॉटेल, खानावळ, ब्युटीपार्लर, सलूनसाठी अर्ज करता येईल.

 

महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील शहरी व ग्रामीण युवक-युवतींची वाढती संख्या तसेच उद्योग व्यवसाय क्षेत्रात, इतर विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून उद्योजकतेला चालना देणारी सर्व समावेशक “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम” ही महत्वाकांक्षी योजना सन 2019 पासून राज्यात राबविली जात आहे. या योजनेची अमलबजावणी जिल्हास्तरावरुन जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयामार्फत व महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येते.

 

नांदेड जिल्हयातील बेरोजगार युवक-युवतींना नवीन व्यवसाय सुरु करावयाचा आहे तसेच व्यवसायात वाढ करावयाची आहे त्यांनी ऑनलाईन वेबसाईटवर अर्ज करावा किंवा योजनेबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी, जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन पहिला मजला सहकारी औद्योगिक वसाहत शिवाजीनगर नांदेड येथे कार्यालयीन कामाच्या दिवशी प्रत्यक्ष भेट द्यावी. ही योजना राबविण्यासाठी या कार्यालयाकडून कोणत्याही खाजगी व्यक्तीची नेमणूक केलेली नाही व त्रयस्थ, मध्यस्थ व्यक्तींकडून आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्रामार्फत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!