नांदेड(प्रतिनिधी)-शासकीय वस्तीगृहासाठी अर्ज केला तरच स्वाधार या योजनेचा लाभ मिळेल या अटीला तात्काळ रद्द करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकर विद्यार्थी कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2018 पासून सुरू आहे. ती योजना मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळत असते. त्यामध्ये शैक्षणिक वर्ष-2024-25 मध्ये शासकीय वस्तीगृहासाठी अर्ज केला तरच स्वाधार योजना मिळणार ही नवीन अट लागू झाली. या अटीमुळे राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, मानसिक, आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होणार आहे. स्वाधार योजना सुरू झाली तेंव्हा सन 2018 मध्ये ही अट नव्हती. नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा निधी मिळण्यासाठी दोन वर्षापासून वाट पाहावी लागत आहे. नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीमुळे आणि नांदेड जिल्ह्यातील भौगोलिक सिमा असलेल्या यवतमाळ, हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कल नांदेडकडे आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्यामुळे स्वाधार योजनेचा वाढीव निधी मिळण्याची आवश्यकता आहे.
शासकीय वस्तीगृहात अर्ज केला तरच स्वाधार योजना मिळणार ही अट रद्द व्हावी. भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर स्वाधार योजना VPDA प्रणालीमधून वगळण्यात यावी. सन 2022-23 आणि सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित रक्कम तात्काळ वितरीत करावी. स्वाधार योजनेची 50 टक्केची अट रद्द करून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ती योजना मिळावी. भारत सरकार शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष संपण्यापुर्वी विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात यावी.स्वाधार योजनेला mahait.com प्रणालीतून वगळ्ण्यात यावे. भारत सरकार शिष्यवृत्ती व स्वाधार योजना व इतर शिष्यवृत्त्यांचा निधी महागाई भत्यानुसार वाढविण्यात यावा. या निवेदनात विद्यार्थी कृती समितीने असे लिहिले आहे की, या सर्व मागण्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या मागण्या आहेत. त्या मागण्या तात्काळ मान्य करून विद्यार्थ्यांना रस्त्यावरील आंदोलने, मोर्चे, निवेदने यातून बाहेर काढून त्यांना शैक्षणिक नुकसानापासून वाचवावे. या निवेदनावर प्रकाश इंगोले, प्रबुध्द काळे, लक्ष्मण वाठोरे, कुणाल भुजबळ, जय एंगडे, रोहित सोनकांबळे, अक्षय गायकवाड, उमाकांत शेट्टे, गजानन नरवाडे, संतोष गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.